Type Here to Get Search Results !

डांबून ठेवलेल्या चोपड्याच्या 11 ऊसतोड मजुरांची सुटका !



* सोलापूरमधील घटना : जनसाहस फॉंउंडेशनच्या हाकेला प्रशासनाची दाद
चोपडा / महेश शिरसाठ :- ऊसतोडीसाठी काम आहे, असे सांगून सोलापूर जिल्ह्यात नेलेल्या चोपड्याच्या रामपुरा भागातील 11 मजुरांना अन्यच काम देत त्यांना डांबून ठेवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. मजुरीची रक्कम न देता या मजुरांवर उपासमारीची वेळ आली असताना जनसाहस संस्थेने प्रशासनाचा दरवाजा ठोठावला. त्यानुसार जळगाव आणि सोलापूरच्या जिल्हा प्रशासनाने सुत्रे हलवित या मजुरांना सुखरुपपणे घरी पोहचते केले आहे.


रामपूरा (चोपडा) या गावातील 11 मजुरांना ऊसतोडीच्या कामासाठी पंढरपूर तालुक्यात नेण्यात आले होते. कित्येक दिवसांपासून मजुरांना पंढरपूरसह अन्य गावांमध्ये ऊसतोड व अन्य  बांधकाम कामासाठी जुंपण्यात आले. मोबदला मागितल्यावर मात्र धमकाविण्यास सुरुवात झाली आणि नजरेखाली ठेवत त्यांच्याकडून काम करवून घेण्यात आले. या प्रवासात एकच मालकांकडे वेगवेगळ्या कामांसाठी जुंपले असताना त्यानुसार मंगलबाई प्रकाश भिल व सुनंदा हिम्मत भिल या मजुरांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविषयीची माहिती जनसाहस संस्थेच्या कामगार हेल्पलाईनला कळविली. तेव्हा जनसाहस संस्थेने पुढाकार घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली. त्यांनी आरडीसी (RDC) यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सोलापूर व पंढरपूर प्रशासनाशी संपर्क सुरु झाला. सोलापूर जिल्हाधिकारी  कुमार आशीर्वाद यांनी कारवाईला सुरुवात केली. महसुल विभाग, कामगार विभाग, पोलिस अधिकाऱ्यांसोबत जळगांव जनसाहस संस्थेचे जिल्हा समन्वयक निलेश शिंदे, राज्य कामगार सुरक्षा समन्वयक सय्यद रुबिना, ॲंड. सी. एस. परमार, जळगांव जनसाहस संस्थेचे क्षेत्र अधिकारी हितेंद्र माळी, सोनम केदार, धाराशिव जनसाहस संस्थेचे क्षेत्र अधिकारी उमा गायकवाड, विक्रम कल्याणकर यांनी मजुरांना गाठले आणि त्यांना ताब्यात घेतले.


जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूरच्या एसडीएम यांच्यासोबत फोनवरून बोलून त्यांना बंधपत्रित कामगार कायद्यानुसार कारवाई करण्याचे आणि बचाव पथक स्थापन करण्याचे आदेश दिले. पुढे रेड अँड रेस्कु प्रोसेस करण्यात आली व कामगारांना पंढरपूर एसडीएम (SDM) कार्यालयामध्ये सुखरूप आणले. पंचनामा व जबाब घेऊन बंधपत्रित कामगार कायद्यानुसार 6 कामगारांना रिलीज सर्टिफिकेट देण्यात आले आणि सुरक्षित व सुखरूपपणे त्यांना जळगांव जिल्हाधिकारी, आरडीसी (RDC), जळगांव विधी सेवा प्राधिकरण येथे जळगाव जनसाहस टीम यांच्यासोबत भेट देऊन कामगारांच्या पुनर्वसन शासकीय योजनेबद्दल चर्चा करण्यात आली व यांच्या गावी सुखरूप पोहचविण्यात आले.


* सुटका करण्यात आलेले मजुर :- रूपाबाई ब्रिजलाल भिल (38 वर्ष), स्वप्नील ब्रिजलाल भिल (17 वर्ष), विक्की ब्रिजलाल भिल (15 वर्ष), सुरेश रतन भिल (30 वर्ष), उषाबाई सुरेश भिल (25 वर्ष), कुणाल सुरेश भिल (7 वर्ष), शिव सुरेश भिल (4 वर्ष), ऋतिका सुरेश भिल (2 वर्ष), पिरण रतन भिल (26 वर्ष), गणेश मानसिंग भिल (22 वर्ष), कविता गणेश भिल (20 वर्ष).

Post a Comment

0 Comments