Type Here to Get Search Results !

देशात नवा इतिहास घडणार !



* रायगड मी मराठी प्रतिष्ठान ३१ डिसेंबर रोजी “पालक कृतज्ञता दिन” साजरा करणार 

खालापुर / सुधीर देशमुख :- विदेशी संस्कृतीच्या प्रभावाखाली वाढत चाललेल्या “थर्टी फर्स्ट” उत्सवांना भारतीय संस्कृतीचा पर्याय म्हणून रायगड मी मराठी प्रतिष्ठान (रजि.) या सामाजिक संस्थेने एक ऐतिहासिक उपक्रम हाती घेतला आहे. या संस्थेच्या पुढाकाराने येत्या ३१ डिसेंबर रोजी संपूर्ण देशात “पालक कृतज्ञता दिन” (Parents Thanksgiving Day) म्हणून साजरा करण्यात येणार आहे.


रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक आदेश लाड यांनी सांगितले की, आजच्या पिढीला आपल्या पालकांच्या कष्टांचे आणि त्यागाचे भान राहिलेले नाही. त्यामुळे समाजात “आपली संस्कृती विरुद्ध विदेशी विकृती” या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. ३१ डिसेंबर या दिवशी “थर्टी फर्स्ट पार्टी”च्या ऐवजी आपल्या आई-वडिलांप्रती कृतज्ञता, प्रेम आणि आदर व्यक्त करणे, त्यांचे आभार मानणे आणि त्यांच्यासमवेत वेळ घालवणे हा या दिवसाचा उद्देश आहे.


या अनोख्या उपक्रमाचा शुभारंभ मुंबईतील पटेल हायस्कूल, गोरेगाव येथे झाला. यावेळी प्रतिष्ठानचा सातवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. याच वेळी देशातील पहिल्या “पालक कृतज्ञता दिन” बिल्ल्याचे अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. या बिल्ल्याच्या प्रकाशनानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे एकमुखाने कौतुक केले आणि आपल्या आपल्या परीने याची जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला.


संस्थापक आदेश लाड यांनी सांगितले की, विदेशात अनेक कुटुंबे आपल्या संस्कृतीपासून दुरावत आहेत. त्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी ‘फॅमिली फर्स्ट’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. भारतातही हे लोण वाढत असल्याने आपल्या समाजात भारतीय संस्कृतीचे बियाणे पुन्हा रुजविणे अत्यावश्यक आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठानने राबविलेला हा उपक्रम पिढ्यान्‌पिढ्या संस्कार व कृतज्ञतेचा आदर्श निर्माण करणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


“रायगड मी मराठी प्रतिष्ठान” ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, संस्कृती, आरोग्य, आणि समाजसेवा क्षेत्रात कार्यरत आहे. सामाजिक उपक्रम, जनजागृती मोहीम, आणि भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी ही संस्था कार्य करते. ३१ डिसेंबर या दिवशी “पालक कृतज्ञता दिन” साजरा करण्याचा हा उपक्रम भारतीय संस्कृतीला नवा आयाम देणारा आणि नव्या विचारांची बीजे पेरणारा ठरणार आहे. थर्टी फर्स्ट पार्टींच्या धांगडधिंगीत हरवलेल्या संवेदनांना नवसंजीवनी देण्याचा हा प्रयत्न आहे.


Post a Comment

0 Comments