Type Here to Get Search Results !

मैत्रेय बुद्ध विहार, विरार येथे भन्ते पियोलोक यांच्या वर्षावास समाप्तीनिमित्त भव्य कठीण चिवरदान सोहळा संपन्न!

* भिक्खू संघाच्या उपस्थितीत श्रद्धा, समर्पण आणि धम्मभावनेने ओथंबलेला सोहळा

* महाराष्ट्रातील पहिल्या वर्षावासाचा ऐतिहासिक क्षण साक्षीदार ठरला मैत्रेय बुद्ध विहार, विरार!

विरार / नरेंद्र पाटील :- विरार पश्चिम येथील मैत्रेय बुद्ध विहार, विराट नगर येथे रविवार, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी भन्ते पियोलोक यांच्या पहिल्या वर्षावास समाप्तीनिमित्त आणि विहाराच्या १३ व्या कठीण चिवरदान सोहळ्याचे आयोजन भिक्खू संघाच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाले. हा सोहळा श्रद्धा, समर्पण आणि धम्म परंपरेचे उत्कृष्ट दर्शन घडवणारा ठरला.

बुद्ध धम्म संघाच्या विनयानुसार, आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्यांच्या कालावधीत भिक्खू संघ एकाच ठिकाणी राहून धम्म साधना, चिंतन आणि उपासकांना प्रवचन देतो. या “वर्षावास” कालावधीची समाप्ती झाल्यानंतर पारंपरिक रीतिरिवाजानुसार “कठीण चिवरदान सोहळा” आयोजित केला जातो, ज्यामध्ये उपासक व उपासिका भिक्खू संघास नवीन वस्त्र (चिवर) अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त करतात.



मैत्रेय बुद्ध विहाराचे संस्थापक अध्यक्ष आयु. अजीव यशवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली १३ वर्षे विहारात विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. तथागत बुद्ध जयंती, बोधिसत्व डॉं. बाबासाहेब आंबेडकर जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, महापरिनिर्वाण दिन, पौर्णिमा - अमावस्या उपोसथ दिन तसेच विहार वर्धापनदिन अशा अनेक कार्यक्रमांमुळे मैत्रेय बुद्ध विहार हा विरार आणि परिसरातील धम्मभावनेचा केंद्रबिंदू बनला आहे.


यंदाच्या १३ व्या कठीण चिवरदान सोहळ्यास पुजनीय भिक्खू अनिरुद्ध महाथेरो, पुज्य भिक्खू सुवण्ण थेरो, पुज्य भिक्खू कल्याणपियो, पुज्य भिक्खू सुदस्सि, पुज्य भिक्खू संपन्नो, श्रावक श्रामनेर धम्मज्योती या भिक्खू संघाच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अध्यात्मिक उंची प्राप्त झाली. या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध भागांतील धम्मप्रेमी उपासक उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले. विरार, नालासोपारा, वसई, सफाळे, पालघर, डहाणू, वानगाव, बोईसर, कांदिवली आणि मालाड येथून श्रद्धावानांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.


भन्ते पियोलोक यांचा महाराष्ट्रातील पहिला वर्षावास सोहळा असल्याने या कार्यक्रमाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. पूर्वी भन्ते सारिपुत्त थेरो, भन्ते सुबोधीलंकार थेरो, भन्ते लोकज्योती थेरो आणि इतर पुजनीय भिक्खूंच्या मार्गदर्शनाखाली झालेले वर्षावास सोहळे विहाराच्या इतिहासातील सुवर्णपान ठरले आहेत. त्याच परंपरेचा पुढाकार भन्ते पियोलोक यांनी घेतल्याने धम्मप्रेमी जनतेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


सोहळ्यात उपस्थित सर्व उपासक उपासिकांनी धम्मानुसार जीवन जगण्याचा संकल्प केला. विहार परिसरात धम्मवाणी, बुद्ध वंदना आणि पाली पठणाने शांततेचा आणि समाधानाचा वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाने बुद्धांच्या करुणा, समता आणि मैत्रीच्या संदेशाला नवी प्रेरणा दिली.


मैत्रेय बुद्ध विहार, विरार येथील कठीण चिवरदान सोहळा हा केवळ धार्मिक नव्हे, तर आध्यात्मिक आणि सामाजिक जागृतीचा उत्सव ठरला आहे. भन्ते पियोलोक यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्याने धम्माच्या दीर्घ परंपरेला नवे बळ मिळवून दिले आहे.


Post a Comment

0 Comments