* कोमसापच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र वितरण
विरार / नरेंद्र पाटील :- डिजिटल युगात पुस्तक वाचन कमी झाले आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून कोमसाप विरार शाखेचे अध्यक्ष अजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विरारमध्ये 6 ते 15 ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या शाळांतवाचन प्रेरणादिनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांत शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
विरार पूर्व मानवेल पाडा येथील अनुसया विद्यालयाच्या मुख्याध्यापक निकिता सामंत यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला. तर ज्युपिटर इंग्लिश स्कूल मानवेल पाडाच्या मुख्याध्यापिका नमिता वर्तक व समन्वयक उज्ज्वला मुदप्पू व मीना ठाकोर यांनी मिळून अभिजात मराठी भाषेचा दर्जा हा सप्ताह साजरा केला. जिल्हा परिषद शाळा कणेर व जिल्हा परिषद शाळा-भाटपाडाचा सर्व शिक्षकवृंद व समन्वयक प्रिता पाटील यांनी वाचनाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांचे वाचन घेतले.
के. जी. हायस्कूल आगाशीमध्ये वंदना वर्तक व अमोल नाईक यांनी समन्वय साधून कोमसापच्या संयुक्तपणे शाखा प्रतिनिधी उमाकांत वाघ यांच्यासह कार्यक्रम साजरा केला. आदर्श विद्यालय नारंगीच्या मुख्याध्यापिका शोभना कलगुटकर यांनी वाचनदिन साजरा केला. तर चंदनसार वासंती बाई विष्णू ठाकूर स्मारक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दक्षता पाटील व स्वागत ॲकॅडमी फुलपाखराच्या मुख्याध्यापिक शुभांगी ठाकूर यांच्या सहकार्याने किशोरी पाटील, सुचित्रा पितळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उत्कर्ष विद्यालय व कोमसाप संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्राचार्य मुग्धा लेले व मुख्याध्यापिका चित्रा ठाकूर मॅडम शिक्षक व 200 विद्यार्थी उपस्थित होते. सर्व शाळांत साधारण इयत्ता चौथी ते नववीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील उतारे व श्यामची आई, सुधा मूर्ती, चिमणराव, एपीजे अब्दुल कलाम अशा नावाजलेल्या मंडळींच्या पुस्तकांतील उताऱ्यांचे वाचन केले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना कोमसापच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली व सर्व शाळांचे कोमसाप विरार शाखेच्या वतीने आभार मानण्यात आले.
Post a Comment
0 Comments