मुंबई / रामदास धो. गमरे :- आपल्या जीवनात जीवन जगण्याचे मोठे उद्देश असले पाहिजेत, स्वतःसाठी आपण स्वप्न पाहत असाल, समाजात जगताना सर्वांच्या जीवनात आपला मोलाचा वाटा असला पाहिजे, ध्येय असलं पाहिजे, संकटावर मात करून आपण वाटचाल केली पाहिजे, भविष्यात काय घडेल हे कोणीही सांगू शकत नाही, आजच्या धावपळीच्या युगात जग बरंच पुढे गेले आहे, माणूस चंद्रावर गेला व तो आता सूर्याला ही पादाक्रांत करण्याच्या प्रयत्नात आहे. डॉं. बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान माणूस या देशातच काय तर जगातही शोधून सापडणार नाही, आपल्या समाजाच्या देशाच्या उन्नतीसाठी ते भारतात परतले, जुनी व्यवस्था मोडीत काढून नव्याने निर्माण करणे त्याचा आराखडा तयार करणे, तंत्रज्ञान हस्तगत करणे आवश्यक आहे, आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे ती शिकून घेतली पाहिजे, सध्या सरकारी, निमसरकारी नोकऱ्या राहिलेल्या नाहीत तेव्हा आपण टेक्नॉलॉजीच्या युगात वावरत असताना आपण त्या क्षेत्रात उतरून प्रगती केली पाहिजे, शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि जो ते पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून उच्चपदस्थ होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, कारण शिक्षणाने मनातील अंधकार दूर होतो" असे प्रतिपादन डॉ. हर्षदीप कांबळे (प्रधान सचिव, मंत्रालय) यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभी प्रमुख वक्ता या नात्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना केले.
सदर प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सभापती आनंदराज आंबेडकरांनी आपल्या भाषणात "बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांच्या पंखांना बळ देऊन आपण जगातील स्पर्धांमध्ये पाठवून विज्ञानाची कास धरणारी एक आदर्श नवीन पिढी निर्माण करण्यासाठी बौद्धजन पंचायत समिती प्रयत्नशील आहे, शिक्षण हेच आपले ध्येय आहे म्हणून ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी असतील त्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा त्यांना योग्य मार्गदर्शन व सल्ला दिला जाईल" अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर माजी सहसचिव, मंत्रालय दिनेश डिंगळे यांनी आपल्या भाषणात "आपण जे शिक्षण घेतो त्याची योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गेल्या १०० वर्षाआधीच करून ठेवली आहे, १९३२ साली समाजकल्याण खात्याची त्यांनी निर्मिती केली, अनेक योजना धोरण राबविले त्यामुळे आपणही बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक होऊन शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल करून आपलं भवितव्य घडवलं पाहिजे" असे नमूद केले. त्यानंतर माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे यांनी आपल्या भाषणात "मराठीप्रमाणेच पाली भाषेलाही मराठी भाषेचा दर्जा मिळाला आहे, वर्षाला साडेतीनशे विद्यार्थी पाली अभ्यासक म्हणून बाहेर पडतात परंतु त्यांना पाली भवन नाही, विद्यापीठात इतर भाषांप्रमाणे पाली भवन असायला हवं त्यासाठी सभापती आनंदराज आंबेडकर साहेबांनी पुढाकार घ्यावा अशी मी विनंती करतो, बार्टी सारख्या स्वयंसंस्थाच्या माध्यमातून पालीतील मराठीत अनुवादित न झालेली नाळकसुत्त, प्रधानसुत्त आदी सुत्तांचे मराठी अनुवाद करता येईल, पालीभवनाची निर्मिती झाल्यास पालीचा प्रचार आणि प्रसार करता येईल त्यानुसार प्रयत्न झाले पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनीही इतर विषयांप्रमाणे पाली विषय घेऊन आपले भवितव्य घडवण्याचा प्रयत्न करावा" असे प्रतिपादन केले, त्यानंतर कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी आपल्या भाषणात "बौद्धजन पंचायत समितीतर्फे शिक्षण धोरणांतर्गत बजेटमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी २५% निधी खर्च केला जातो ज्यातून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी हातभार लावला जातो" असे नमूद केले.
बौद्धजन पंचायत समिती संलग्न शिक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवीधर, पदविकाधर, उद्योगक्षेत्र, ग्राफिक डिझाइन, सायकॉलॉजी आदी वेगवेगळ्या क्षेत्रातील प्राविण्य मिळवलेल्या विध्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उपसभापती विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई - १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला, सदर प्रसंगी चिटणीस मंगेश पवार गुरुजी यांनी आपल्या सुमधुर वाणीने धार्मिक पूजापाठ केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस राजेश घाडगे यांनी आपल्या पहाडी आवाजात अत्यंत प्रभावी व लाघवी भाषाशैलीत केले, शिक्षण समितीचे अध्यक्ष राजेश पवार यांनी प्रास्ताविक सादर करताना शिक्षण हा बौद्धजन पंचायत समितीचा आत्मा असून अनेक विद्यार्थी समितीच्या माध्यमातून घडले आहेत व ते आज उच्चपदावर कार्यरत आहेत, यापुढे ही असेच अनेक उपक्रम, शिक्षण शिबिर सभापती आनंदराज आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली राबविले जातील, तसेच परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनाही काही अडचणी असल्यास त्यांनी संपर्क साधावा असे नमूद केलं.
अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद मोरे यांनी सर्वांना संबोधित करताना "आजच्या विद्यार्थ्यांचा अहवाल पाहता मुली या मुलांपेक्षा आघाडीवर दिसतात हा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेचा विजय आहे, परंतु मुलांनीही आपल्या प्रगतीचा आलेख वाढवीत मुलींसोबत समतोल साधला पाहिजे आज शिक्षणेत्तर अनेक कोर्स उपलब्ध आहेत त्यात प्रामुख्याने एमएससीआयटी, ग्राफिक्स आणि ऑटोकॅड डिझाइन, टायपिंग, शॉर्टहॅन्ड सारखे कोर्स केल्यास त्यांना नोकरीचे नवे आभाळ मोकळे होऊ शकते विशेषतः मराठी, इंग्रजी टायपिंग व शॉर्टहॅन्ड असणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून कोर्टात प्राधान्य मिळते म्हणून याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात ही कल घ्यावा" असे नमूद केले
सदर प्रसंगी उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे (कणगोलकर), मनोहर सखाराम मोरे, चंद्रमनी तांबे, चिटणीस लवेश तांबे, यशवंत कदम, संदेश खैरे, रवींद्र शिंदे, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, महेंद्र पवार, अरविंद मोरे, अशोक मोहिते, सुशीलाताई जाधव, अंजलीताई मोहिते, प्रमिलाताई मर्चंडे आदी मान्यवर तसेच पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते, सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे आभार मानून शिक्षण समितीचे चिटणीस अशोक मोहिते यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
Post a Comment
0 Comments