* मु. जे. महाविद्यालय प्रशासनावर नातेवाईकांचा गंभीर आरोप ; एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
जळगांव / प्रतिनिधी :- कामाच्या ठिकाणी सतत त्रास, कंत्राटी नोकरी कायम करण्यासाठी मोठी रक्कम देऊनही नोकरीतून हाकलून लावणे आणि त्यानंतर मानसिक तणाव वाढल्याने देविदास कॉलनीतील 52 वर्षीय इसमाने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (17 नोव्हेंबर) दुपारी उघडकीस आली आहे. मृत इसमाच्या नातेवाईकांनी मु. जे. महाविद्यालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
* मयताचे नाव महेश भास्करराव सावदेकर :- सोमवारी दुपारी पत्नी कामावर व मुलगा क्लासला असताना महेश सावदेकर हे घरी एकटेच होते. त्याच वेळी त्यांनी विष प्राशन केले. तीनच्या सुमारास शेजाऱ्यांना ते जमिनीवर पडलेल्या अवस्थेत व तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आले. शेजाऱ्यांनी तत्काळ त्यांच्या पत्नी व भाऊ अविनाश सावदेकर यांना माहिती दिली. त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
* 15 लाख रुपये दिले, तरी कामावरून काढले - पत्नीचा आरोप :- मयताची पत्नी यशोधरा सावदेकर यांनी सांगितले की, महेश सावदेकर अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने मु. जे. महाविद्यालयात कार्यरत होते. त्यांना मोठ्या पगाराची सही घेतली जात असे, पण प्रत्यक्षात अतिशय कमी रक्कम दिली जात होती नोकरी कायम करण्यासाठी जवळपास 15 लाख रुपये संस्थेला दिले, या व्यवहारात दिलीप रामू पाटील नावाच्या व्यक्तीने मध्यस्थी केल्याचा आरोप तरी देखील त्यांना कायम न करता दीड महिन्यांपूर्वीच नोकरीतून काढून टाकले.
* वारंवार विनंती करूनही दुर्लक्ष :- नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार नोकरी गेल्यानंतर महेश सावदेकर वारंवार महाविद्यालयात गेले, पण त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. “येऊ नका… काम नाही…” असे सांगून त्यांना प्रवेश नाकारला जात होता. “मी त्यांच्या हातापाया पडलो, तरी घेतले नाही…” असे ते कुटुंबीयांना सांगत होते. या सर्व घडामोडींमुळे ते तीव्र मानसिक तणावात गेले व आत्महत्या केली, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
* जबाबदारांवर कारवाईची मागणी :- यशोधरा सावदेकर यांनी पतीच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रकरणाची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू (A.D.) म्हणून करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
* कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शोषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत :- या प्रकरणामुळे कंत्राटी पद्धतीतील कर्मचाऱ्यांचे शोषण, बनावट पगारपत्रे, कायमस्वरूपी नोकरीच्या नावाखाली पैशांची उकळपट्टी आणि शिक्षणसंस्थांमधील अनियमितता यांसारख्या गंभीर मुद्द्यांना नव्याने तोंड फुटले आहे. नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे.

Post a Comment
0 Comments