Type Here to Get Search Results !

खोपोली नगरपरिषद निवडणूक 2025 : मतदार जनजागृती मोहीम जोरात

* रांगोळी, गॅंस सिलेंडर, कचरा व अग्निशमन वाहनातून मतदान संदेश - घराघरात पोहोचला ‘आपलं मत, आपला हक्क’

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शहरभर मतदार जनजागृतीची व्यापक मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम अधिक प्रभावीपणे अंमलात आणली जात असून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नवीन उपक्रमांचा अवलंब करण्यात आला आहे.

* जनजागृती पथकाचा पुढाकार :- सुरेश तारडे आणि निशिकांत सुर्वे यांच्या सक्रिय सहभागातून जनजागृती पथक शहरातील प्रमुख परिसरांत, प्रभागांत आणि शाळांमध्ये जाऊन मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देत आहे. या उपक्रमांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मतदानाबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.


* नवीन प्रयोगांनी जनजागृती मोहीम ठरली आकर्षणाचे केंद्र :- जनजागृतीच्या विविध उपक्रमांमध्ये विशेषत: उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

- शाळांमध्ये रांगोळी व चित्रकला स्पर्धा :- मतदानाविषयी संदेश देणाऱ्या आकर्षक रांगोळ्या आणि पोस्टर्समुळे विद्यार्थ्यांमध्येही लोकशाही मूल्यांची जागृती.

- गॅस सिलेंडरवर मतदान स्टिकर :- घराघरात पोहोचणाऱ्या सिलेंडरवर मतदान संदेश "घराघरात मतदानाची आठवण”.

- कचरा वाहनांवर स्टिकर्स :- संपूर्ण खोपोली शहरात फिरणाऱ्या कचरा वाहनांवर मतदान जनजागृतीचे स्टिकर्स - प्रत्येक प्रभागापर्यंत संदेशाची पोहोच.

- अग्निशामन वाहनाचा वापर :- फायर ब्रिगेड वाहनांद्वारे ध्वनी जाहिरात आणि जागृती संदेश देत विशेष मोहीम.


* मतदान संस्कृती बळकट करण्याचा प्रयत्न :- “आपलं मत, आपला हक्क - लोकशाहीचा सन्मान” हा संदेश शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचत असून या मोहिमेमुळे विविध वयोगटांमध्ये मतदानाविषयी सकारात्मक चर्चा सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या मते, या व्यापक मोहिमेमुळे मतदानाबाबतची जनजागृती वाढेल, नागरी सहभाग अधिक प्रभावी होईल, निवडणूक प्रक्रियेबद्दलची जाणीव बळकट होईल, खोपोलीतील मतदानाचा टक्का लक्षणीयरीत्या वाढेल.


खोपोली शहरात लोकशाहीची जागरुकता वाढविण्याच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत असून आगामी निवडणूक अधिक उत्साहात पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments