* दरीत कोसळलेल्या कंटेनरमध्ये चालकाचा मृत्यू
* तीव्र उतराईवर वाहनाचा ताबा सुटल्याने गंभीर दुर्घटना
* महामार्ग पोलिस, हेल्प फाउंडेशन आणि बचाव पथकांची संयुक्त मदत
खोपोली / प्रतिनिधी :- मुंबई - पुणे एक्सप्रेसवेलगत जुन्या महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. मिळगाव ठाकूरवाडी परिसरात एक कंटेनर खोल दरीत कोसळून पलटी झाला. यात चालकाचा केबिनमध्येच अडकून जागीच मृत्यू झाला. एक्सप्रेसवेवरील अपघातांची मालिका कायम असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.
* कंटेनर दरीत कोसळून चालकाचा जागीच मृत्यू :- पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेला कंटेनर (MH 23 W 3077) खोपोली एक्झिटनंतर तीव्र उतराईच्या मार्गांवरून वेगात येत होता. अचानक वाहनाचा ताबा सुटल्याने कंटेनर मिळगाव ठाकूरवाडी परिसरातील खोल दरीत कोसळून पलटी झाला. या अपघातात कर्मराज रामनारायण (वय 45, रा. कटघरपट्टी कादीपूर, सुलतानपूर, उत्तर प्रदेश) हे चालक केबिनमध्येच अडकले. छातीवर गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू तत्काळ झाला.
* त्वरीत बचावकार्य - अनेक पथकांची धाव :- अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलिस केंद्राचे प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठीलकर व त्यांची टीम, खोपोली पोलिस, आयआरबी टीम, मृत्युजंय टीम या सर्वांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. अडकलेल्या मृतदेहाला मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले. पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय, खालापूर येथे पाठविण्यात आला.
* सुरक्षा उपायांकडे पुन्हा लक्ष :- या अपघातानंतर एक्सप्रेसवेवरील सुरक्षेचे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले आहेत. तीव्र उतराईचे मार्ग, वेग नियंत्रण, वाहनांची देखभाल आणि वेगमर्यादा पाळण्याचे महत्त्व अधोरेखित होत आहे. महामार्ग पोलिसांनी वाहनचालकांना अशा धोकादायक चढ - उतारांच्या मार्गांवर विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment
0 Comments