* चिमुरडीवर अत्याचार व खूनप्रकरणी निषेध मोर्चे
* आरोपीला फाशीची मागणी ; सराफ बाजार बंद
* तहसील कार्यालयावर नागरिकांचे निवेदन
चाळीसगाव - पाचोरा / प्रतिनिधी :- मालेगाव तालुक्यातील चार वर्षांच्या चिमुरडीवर झालेले अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेविरोधात चाळीसगाव आणि पाचोरा शहरात संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी दोन्ही ठिकाणी हजारो नागरिक, समाज बांधव, महिला, तरुण आणि मान्यवरांनी निषेध मोर्चे काढून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
* चाळीसगाव : संत नरहरी महाराज चौकातून तहसीलपर्यंत जनआक्रोश :- चाळीसगाव येथे सकाळी 10 वाजता संत नरहरी महाराज चौकातून निषेध मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा सराफ बाजारपेठ, शहरातील मुख्य मार्गांद्वारे तहसील कार्यालय व पोलिस ठाण्यावर पोहोचला. नागरिकांनी "अत्याचाराला मृत्यूदंडच हवी शिक्षा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या घटनेविरोधात सराफ बाजारपेठ मंगळवारी दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली.
* आरोपीला फाशीची मागणी :- मोर्चा तहसीलवर पोहोचल्यावर समाज प्रतिनिधींनी निवेदन देत आरोपीला फास्टट्रॅक कोर्टात जलदगतीने सुनावणी करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. या मोर्चात प्रभाकर बाविस्कर, गजानन वानखेडे, अमरनाथ जगताप, अनिल विसपुते, श्याम दंडगव्हाळ, प्रकाश विसपुते, संजय सोनार, राजेंद्र बाविस्कर, सुनील नेरकर, राहुल बाविस्कर, किरण बाविस्कर आदींसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. निवेदन देताना आमदार मंगेश चव्हाण, अभिषेक देशमुख, किसनराव जोर्वेकर, नितीन पाटील, टोनू राजपूत, रोशन जाधव, बा. निं. पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
* पाचोरा : चिमुकल्यांसह सुवर्णकार समाजाचा मूक मोर्चा :- पाचोरा येथे या निर्घृण घटनेविरोधात सुवर्णकार समाजाने मूक मोर्चा आयोजित केला. लहान चिमुकल्यांनी हातात फलक घेऊन सहभागी होत समाजाच्या विव्हळलेल्या भावना व्यक्त केल्या. मोर्चाच्या अग्रभागी आमदार किशोर पाटील, सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष बापू सोनार, भूषण वाघ यांनी काळ्या फिती लावून सहभाग घेतला. येथे ही तहसीलदारांना निवेदन देत आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी, असे ठामपणे नमूद करण्यात आले.
* जिल्हाभरात संताप - न्यायासाठी एकमुखी लढा :- या निर्घृण अत्याचाराने जिल्हाभरात संताप उसळला असून दोन्ही शहरांतील मोर्चांद्वारे पीडितेला न्याय मिळवण्यासाठी समाज एकत्र येत आहे. नागरिकांच्या भावना तीव्र असून सरकारने तातडीने लक्ष देऊन आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.

Post a Comment
0 Comments