* विक्री - तस्करी रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
* गुटखा कंपन्यांच्या मालकांवरही कारवाईची तयारी
मुंबई / प्रतिनिधी :- राज्यात पूर्णपणे बंदी असलेल्या गुटख्याचा मोठ्या प्रमाणावर अवैध पुरवठा आणि विक्री सुरू असल्याने महाराष्ट्र सरकारने यावर कठोर कारवाईची दिशा पकडली आहे. आरोग्यास घातक आणि युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या गुटखा व्यापारावर नियंत्रण आणण्यासाठी गुटका विक्रेते, तस्कर आणि कंपन्यांच्या संचालकांवर थेट ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA)’ लागू करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन (FDA) मंत्री नरहरी झिरवाल यांनी दिली. हा निर्णय लागू झाला, तर राज्यातील गुटका विक्रेत्यांची झोप उडणार हे निश्चित आहे.
* गुटख्यावर बंदी असतानाही तस्करी कायम :- राज्यात गुटखा आणि पान मसाल्याच्या उत्पादन, वाहतूक आणि विक्रीवर बंदी असतानाही बाहेरील राज्यांतून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गुटखा महाराष्ट्रात येत असल्याचे एफडीए (FDA) च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. यामुळे विद्यार्थी, तरुण, महिला, लहान मुले यांच्यामध्ये गुटख्याचे वाढते व्यसन चिंताजनक ठरत आहे.
* मुख्य सूत्रधारांवरही मोक्का लागू करण्याची तयारी :- मंत्री नरहरी झिरवाल यांनी म्हटले आहे की, फक्त लहान विक्रेते नव्हे, तर या अवैध व्यापारामागील कंपन्यांचे मालक, संचालक आणि मुख्य सूत्रधारांवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हे नोंदविण्याचा विचार होत आहे. यासाठी कायदा व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागणारा प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
* राज्य सरकार अधिक कडक अंमलबजावणी करणार :- मंत्रालयात झालेल्या बैठकीत झिरवाल यांनी सांगितले की, राज्यभरात गुटखा वाहतूक आणि विक्रीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. जिल्हा स्तरावर कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. विविध विभागांमार्फत कर्करोगास कारणीभूत तंबाखूजन्य पदार्थांविरुद्ध जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
* अवैध गुटखा विक्रेत्यांवर सरकारची मोठी कारवाई :- राज्यभरातील गुटखा विक्रेते आणि तस्करांसाठी येणारा काळ कठीण असणार आहे. मोक्का लागू झाल्यास जामीन न मिळणे, दीर्घकालीन कारावास, आर्थिक दंड, संपूर्ण नेटवर्कचा बंदोबस्त अशा कठोर शिक्षा लागू होऊ शकतात.
राज्य सरकारकडून गुटखा तस्करीवर पूर्णविराम देण्यासाठी मोठे आणि निर्णायक पाऊल उचलले जात आहे. नागरिकांनीही अशा आरोग्यघातक पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments