* सर्व डॉक्टरांना दोन आठवड्यात रुग्ण नोंदणी बंधनकारक ; 2027 पर्यंत ‘कुष्ठमुक्त महाराष्ट्र’चे उद्दिष्ट
रायगड / प्रतिनिधी :- राज्य सरकारने कुष्ठरोगाला "नोटिफायबल डिसीज" म्हणून घोषित केले असून, त्यामुळे राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी डॉक्टरांना कुष्ठरोगाचे निदान झालेल्या प्रत्येक नवीन रुग्णाची नोंद दोन आठवड्यांच्या आत आरोग्य विभागाकडे करणे आता अनिवार्य ठरणार आहे. राज्यातील कुष्ठरोग नियंत्रण, लवकर ओळख आणि वेळेत उपचार मिळावेत या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
* कुष्ठरोगाबद्दल भीती आणि गैरसमज अजूनही कायम :- कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टरियम लेप्रे या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. त्याचा परिणाम त्वचा, परिघीय मज्जातंतू, डोळे आणि इतर अवयवांवर होतो. या आजाराबाबत अजूनही समाजात भीती, गैरसमज आणि कलंक कायम आहे. लवकर निदान न झाल्यास किंवा उपचारात विलंब झाल्यास रुग्णाच्या शरीरावर विकृती निर्माण होऊ शकते. आरोग्य विभागाने सांगितले की, लवकर निदान आणि योग्य औषधोपचार हेच कुष्ठरोग नियंत्रणाचे मुख्य उपाय आहेत.
* 2027 पर्यंत ‘कुष्ठमुक्त महाराष्ट्र’ :- राज्य शासनाने 2027 पर्यंत महाराष्ट्र कुष्ठरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. या अभियानात संसर्गाची साखळी पूर्णपणे तोडणे, रोगाचा प्रसार शून्यावर आणणे, मुलांमध्ये विकृतीचे प्रमाण शून्यावर आणणे, कुष्ठरोगाविषयी समाजातील भेदभाव नष्ट करणे या बाबींना प्राधान्य दिले जाणार आहे. सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील डॉंक्टर, पॅथॉलॉजिस्ट, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, आरोग्य कर्मचारी आणि क्षेत्रीय अधिकारी यांनी रुग्णांचे निदान, उपचार आणि रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे.
* रायगड जिल्ह्यात 390 रुग्ण उपचाराखाली :- रायगड जिल्ह्यात सध्या 390 कुष्ठरुग्ण नियमित औषधोपचाराखाली आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना कुष्ठरोग निदान व नोंदणी संबंधी नियम काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
* कुष्ठरोग बरा होतो, घाबरू नका :- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉं. आनंद गोसावी आणि कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉं. प्राची नेऊळकर यांनी नागरिकांना कुष्ठरोगाबद्दल भीती न बाळगण्याचे आवाहन केले.
त्यांचे आवाहन आहे की, त्वचेवर चट्टे, संवेदनशून्यता किंवा कुष्ठरोगाची लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधा. कुष्ठरोगाचे पूर्ण उपचार उपलब्ध असून हा आजार बरा होऊ शकतो.

Post a Comment
0 Comments