* डोंगराळे येथील चिमुकलीवरील अत्याचारानंतर नगरदेवळ्यात कँडल मार्च
* नागरिकांची एकमुखी मागणी : आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेविरोधात नगरदेवळा शहरात संतापाची लाट उसळली आहे. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेचा निषेध म्हणून नगरदेवळा बाजार पट्ट्यात मोठ्या प्रमाणात निषेध कँडल मार्च काढण्यात आला. शहरातील सर्व समाज घटक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सहभागी झाले.
समस्त नगरदेवळा ग्रामस्थांनी हातात कँडल, फलक आणि बॅनर घेऊन शांततेत पण तीव्र भावना व्यक्त करीत या अमानुष कृत्याचा जाहीर निषेध केला. बेटी बचाओ, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, अत्याचाऱ्यांना फाशी द्या, अशा घोषणा देत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला.
डोंगराळे येथील चिमुकलीवरील अत्याचाराने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. चार वर्षांच्या निरागस मुलीवर झालेल्या निर्घृण कृत्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या घटनेने केवळ एक कुटुंबच नव्हे तर संपूर्ण समाज अस्वस्थ झाला असून नागरिक एकत्र येऊन न्यायासाठी आवाज उठवत आहेत.
मोर्चादरम्यान अनेकांनी व्यक्त केले की, अशा राक्षसी कृत्याला समाजात स्थान नाही. सरकारने तातडीने लक्ष द्यावे आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देऊन आदर्श ठरवावा.
या निषेध मार्चमध्ये अनेक सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला संघटना आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चा शांततेत पार पडला असून सर्वांची मागणी एकच पीडित चिमुकलीस न्याय, आरोपीला तत्काळ कठोर शिक्षा.
या घटनेनंतर दोन्ही शहरांसह जिल्हाभरात संतापाचे वातावरण असून पुढील काळातही न्यायासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Post a Comment
0 Comments