Type Here to Get Search Results !

शेतकरी कुटुंबातील मुलीची ‘आकाशाशी’ थेट गाठ

* शेतकऱ्याची मुलगी बनली तालुक्यातील पहिली महिला पायलट

* शिंदेवाडीच्या कन्येची जिद्द, मेहनत आणि चिकाटीला यश

* ग्रामीण भागातून भरारी घेत देशात गावाचे नाव उज्ज्वल

शिंदेवाडी (ता. माळशिरस) / अनिल पवार :- माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी या छोट्याशा ग्रामीण गावातील एका शेतकरी कुटुंबातील मुलीने आकाशात भरारी घेत गावाचे नाव देशभर पोहोचवले आहे. प्रतिकूल परिस्थिती, मर्यादित संसाधने आणि आर्थिक अडचणी असूनही या मुलीने आपल्या जिद्द, निष्ठा आणि कष्टाच्या जोरावर तालुक्यातील पहिली महिला पायलट होण्याचा मान पटकावला आहे.


* शिक्षणाची वाटचाल - संघर्षातून यशाकडे :- शेतकरी दाम्पत्याच्या या मुलीसाठी पायलट होण्याचा प्रवास खडतर होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणात अनेक अडचणी येत राहिल्या. परंतु आई-वडिलांनी कष्ट कमी पडू दिले नाहीत. मुलीच्या शिक्षणात कुठेही अडथळा येऊ दिला नाही आणि मुलगीही आई-वडिलांच्या त्यागाचा मान ठेवत दिवस-रात्र मेहनत करीत राहिली. तिने परगावी जाऊन उच्च शिक्षण घेतले आणि कठीण पायलट प्रशिक्षण पूर्ण केले. "अडचणी कितीही असल्या तरी स्वप्ने मोठी ठेवा आणि मेहनत सोडू नका” हे तिच्या प्रवासाने स्पष्ट करीत ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणेचा नवा अध्याय रचला आहे.


* घरच्या कष्टातून जन्मलेला ‘आकाशाचा अभिमान’ :- पायलट होण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता, कठोर प्रशिक्षण, शिस्त, मानसिक व शारीरिक ताकद या सर्व आवश्यक गोष्टी तिने सातत्यपूर्ण मेहनतीने स्वतःमध्ये विकसित केल्या. आज तिच्या कर्तृत्वाने संपूर्ण गाव अभिमानाने एकत्र आला आहे. गावात तिचे स्वागत, सत्कार आणि अभिनंदनाचा जल्लोष सुरू आहे.


* संपूर्ण शिंदेवाडीचा डोळा अभिमानाने भरला :- तिच्या यशामुळे आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले. तिच्या यशाने गावाची मान उंचावली तसेच तालुक्यातील मुलींना नवे स्वप्न पाहण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. गावकऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्याची मुलगी पायलट झाली, ही आमच्यासाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद घटना आहे.


* जिद्द असेल तर अशक्य काहीही नाही :- तालुक्यातील पहिली महिला पायलट बनण्याचा मान मिळवत तिने सिद्ध केले की, ग्रामीण मुलीही मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतात, जर निर्धार मजबूत असेल. तिच्या पुढील प्रवासासाठी कुटुंबिय, गावकरी, शिक्षक वर्ग आणि संपूर्ण तालुक्यांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भविष्यात ती आकाशात आणखी मोठी भरारी घेईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.


Post a Comment

0 Comments