* शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आरोप
* उमेदवारांसमोर राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने तणाव
* खोपोलीत परिवर्तन विकास आघाडीत बिघाडी
* अजित पवार गटाबाबत शिवसेना ठाकरे गटात नाराजी
खोपोली / केपी न्यूज ब्युरो :- खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 चे बिगुल वाजताच सर्व पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. अनेक ठिकाणी युती, आघाड्या आणि काही ठिकाणी स्वतंत्र लढती अशी विविध राजकीय समीकरणे तयार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची भूमिका असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यात आज मोठी दरी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले.
* जागावाटपात आमची फसवणूक :- आज खोपोलीत शिवसेना (उद्धव) गटाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप करण्यात आले. उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत व तालुकाध्यक्ष एकनाथ पिंगळे यांनी खुलासा केला की, आम्ही 10 ते 12 जागा मागितल्या होत्या. राष्ट्रवादीने 10 ऐवजी 8, त्यानंतर 5 जागा देण्याची तयारी दाखवली. तरी सुद्धा ज्या 3 जागांवर तडजोड केली होती, त्या प्रभागातही त्यांनी स्वतःचे उमेदवार उभे केले. ही सरळ सरळ आमची फसवणूक व आघाडीतील विश्वासघात असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे परिवर्तन विकास आघाडीतून एकसंध लढतीचे चित्र आता ढासळतांना दिसत आहे.
* आमच्या उमेदवारांसमोरच त्यांचे उमेदवार दाखल :- ठाकरे गटाने पत्रकार परिषदेत सांगितले की, परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे ठरल्यावरही राष्ट्रवादीकडून त्याच प्रभागात, त्याच जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले गेले. यामुळे निवडणुकीतील आघाडीची समीकरणे पूर्णपणे बदलली असून विरोधी मतांचे विभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, संपर्क प्रमुख उमेश गावंड, शहर प्रमुख अंकुश पवाली आदी उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रवादीवर तीव्र शब्दांत निशाणा साधत सांगितले की, आघाडीत एकात्मता न राखता, आमच्या उमेदवारांसमोर उमेदवार उभे करणे हा राजकीय बेइमानीचा प्रकार आहे. खोपोलीकरांना स्पष्ट सांगतो की आम्ही फसवणूक सहन करणार नाही.
* आघाडीत बिघाडी - बदलणार राजकीय समीकरणे ? :- या वादामुळे परिवर्तन विकास आघाडी कमकुवत होण्याची शक्यता असून याचा विरोधकांना फायदा होण्याची शक्यता आहे. महायुतीसाठी ही मोठी राजकीय संधी आहे. शिवसेना (उद्धव) गट स्वतंत्र लढतीकडे झुकला तर समीकरणे ढवळून निघणार आहेत. खोपोली निवडणूक त्यामुळे अधिकच चुरशीची आणि रोचक होत आहे.
परिवर्तन विकास आघाडीतील बिघाडी ही केवळ जागावाटपाची नाही तर विश्वास आणि नेतृत्व सन्मानाचा प्रश्न बनली आहे. शिवसेना (उद्धव) गटाने घेतलेली भूमिका आणि राष्ट्रवादीवर केलेले आरोप निवडणूक रिंगणात आगामी दिवसांत मोठा बदल घडवू शकतात, अशी शक्यता राजकीय सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments