Type Here to Get Search Results !

खोपोली नगरपरिषद निवडणुकीसाठी पोलिसांची कडक तयारी

* दंगा काबू योजना व रूट मार्चच्या माध्यमातून निवडणुकीत कसून सज्जता

* खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉं. विशाल नेहुल यांचा पाहणी व सुरक्षा आढावा दौरा

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 शांततामय, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त पार पाडण्यासाठी रायगड जिल्हा पोलिस प्रशासन या निवडणुकीत अधिक कठोर आणि सक्रिय भूमिकेत उतरले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉं. विशाल नेहुल व खोपोली पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांनी शहरातील सर्व प्रभागांना भेट देत निवडणूक यंत्रणेची सखोल पाहणी केली.

आजच्या पाहणीदरम्यान डॉं. विशाल नेहुल यांनी कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. “निष्पक्ष, निर्भय आणि दबावमुक्त निवडणूक हा पोलिस प्रशासनाचा स्पष्ट हेतू असून, कोणत्याही प्रकारची अनुचित हालचाल सहन केली जाणार नाही,” असा ठाम इशारा त्यांनी दिला. विशेष दक्षता, वाढीव गस्त आणि संशयितांवर बारकाईने नजर ठेवण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.


2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षेतील त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश डॉं. विशाल नेहुल यांनी दिले. मतदान केंद्रांची रचना, सीसीटीव्ही नियंत्रण, पोलिस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थापन, असामाजिक घटकांवरील कारवाई तसेच निवडणूकपूर्व आणि निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीनची सुरक्षा यांचा त्यांनी काटेकोर आढावा घेतला.


डॉं. विशाल नेहुल यांच्या सूचनांनुसार खोपोलीमध्ये पोलिस दलाने दंगा काबू योजना राबवून तसेच रूट मार्च काढून निवडणूकपूर्व वातावरणात कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्याची तयारी पूर्ण केली आहे. या कारवाईमुळे खोपोलीतील निवडणूक प्रक्रिया अधिक सक्षम, सतर्क आणि पोलिस नियंत्रणाखाली असल्याचे अधोरेखित झाले आहे.


या निवडणुकीत कुणालाही गैरप्रकार करण्याची संधी मिळणार नाही, असा ठाम संदेश पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Post a Comment

0 Comments