* उद्योगमंत्री उदय सामंत : नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांना विजय मिळवून द्या ; विकासाचे राजकारण मजबूत करू !
खोपोली / केपी न्यूज ब्युरो :- खोपोली, कर्जत आणि माथेरान नगर परिषद निवडणुका अगदी आठवड्याभरावर येऊन ठेपलेल्या असतांना महायुतीने निवडणूक प्रचारात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शिवसेना - भाजप - आरपीआय महायुतीची महाप्रचार सभा आज 22 नोव्हेंबर रोजी सायं. 5 वाजता खोपोली लायन्स क्लब येथे उत्साहात पार पडली.
* निवडणूक चाणाक्षपणे लढवा - भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी :- भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी मार्गदर्शन करीत सांगितले की, ही निवडणूक संवेदनशील असून सर्व कार्यकर्त्यांनी चाणाक्ष नियोजन, शिस्तबद्ध संपर्क आणि विकास कामांची योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.
* कुलदीपक शेंडे यांना नगराध्यक्ष बनविण्यासाठी एकत्र मेहनत करा - आमदार महेंद्र थोरवे :- आमदार महेंद्र थोरवे यांनी महायुतीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्या विजयासाठी सर्वांनी पूर्ण ताकदीने काम करण्याचे आवाहन केले. जनतेपर्यंत महायुतीने केलेल्या विकास कामांची माहिती पोहोचविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
* खोपोलीतील प्रश्न केंद्रापर्यंत नेऊन मार्ग काढू - खासदार श्रीरंग बारणे :- मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी खोपोलीतील स्थानिक मुद्द्यांवर, विशेषत: रेल्वेसंबंधी प्रश्नांवर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
* महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा ; विजय सोहळ्यास मला बोलवा - उद्योगमंत्री उदय सामंत :- महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महायुतीचे कार्य, आमदार - खासदारांचे योगदान आणि खोपोलीतील विकासकामांचा उल्लेख करीत मतदारांना भावनिक आवाहन केले.
उदय सामंत म्हणाले की, नगराध्यक्षपदाचे महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे आणि सर्व उमेदवारांना एकदिलाने निवडून द्या. तुमचा विजय सोहळा झाल्यावर मला नक्की निमंत्रण द्या ; मी नक्की येईल. त्यांच्या या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
या सभेला उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, आमदार महेंद्र थोरवे, संपर्क प्रमुख विजय पाटील, माजी राजिप उपाध्यक्ष भाई शिंदे, शिवसेनेच्या रायगड महिला प्रमुख सुप्रिया साळुंखे, महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे, आरपीआयचे पदाधिकारी तसेच शिवसेना - भाजप - आरपीआयचे अनेक पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे निवडणूक वातावरण अधिकच तापले.

Post a Comment
0 Comments