* सदाशिवनगर शाळेला मानाचा तुरा : 'टॅलेंट हंट’ वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक
* सतत चौथ्या वर्षी शाळेचा माळशिरस तालुक्यात बुलंद दबदबा
माळशिरस / अनिल पवार :- विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा ‘टॅलेंट हंट’ जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सदाशिवनगर केंद्र शाळेचा विद्यार्थी हर्षल शहाजी पालवे याने जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवून शाळेला मानाचा तुरा मिळवून दिला आहे. सलग चौथ्या वर्षी शाळेने जिल्हास्तरावर उल्लेखनीय कामगिरी करीत माळशिरस तालुक्याची शैक्षणिक छाप ठळकपणे उमटवली आहे. या यशाचे कौतुक करीत गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी म्हणाल्या की, सदाशिवनगर शाळेच्या सातत्यपूर्ण कामगिरीने तालुक्याचा लौकिक उंचावला आहे. हर्षलने मिळवलेले यश ही शाळेच्या उत्कृष्ट गुणवत्तेची पावती आहे.
* हर्षलचा गटशिक्षणाधिकार्यांच्या हस्ते सत्कार :- हर्षल पालवे, त्याचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांचे त्यांनी मनापासून कौतुक केले आणि ही परंपरा कायम ठेवून आणखी मोठी यश मिळवावी, असे आवाहनही केले.
या सन्मान सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. नूतन विस्ताराधिकारी अस्लम इनामदार, सिद्धेश्वर भरते, संध्या नाचणे, सरपंच वीरकुमार दोशी, उपसरपंच विष्णु भोंगळे, कर्मवीर विद्यालयाचे पर्यवेक्षक फडतरे सर, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष जाधव व सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. हर्षलचे आई - वडील, आजोबा व कुटुंबीयही कार्यक्रमात उपस्थित होते आणि त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
* ग्रामस्थांचे सहकार्य कौतुकास्पद :- विस्ताराधिकारी सिद्धेश्वर भरते यांनी बोलताना शाळेबद्दल ग्रामस्थांचे सातत्यपूर्ण सहकार्य हीच सदाशिवनगर शाळेच्या प्रगतीमागची ताकद असल्याचे नमूद केले.
* गावभर आनंदोत्सव :- हर्षलच्या यशानंतर ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पालवे कुटुंबीयांच्या वतीने विद्यार्थ्यांना पेढ्यांचे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. सदाशिवनगर शाळेच्या या उल्लेखनीय कामगिरीचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments