* मी निवडून आलो तर माझा संकल्प, माझा वचननामा खोपोलीकरांसाठीच!
* अपक्ष उमेदवार किशोर साळुंके यांचे मतदारांना थेट आवाहन
* नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार किशोर साळुंके यांची लोकाभिमुख घोषणा
* क्रीडा, पायाभूत सुविधा, आरोग्य, सामाजिक सेवा आणि पारदर्शक प्रशासनाचे आश्वासन
* खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 - अपक्ष उमेदवाराचा दमदार वचननामा जाहीर
खोपोली / मानसी कांबळे :- नगर परिषद निवडणूक 2025 ची राजकीय रणधुमाळी रंगात आली असून, अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किशोर साळुंके यांनी खोपोलीकरांसाठी आपला व्यापक संकल्प व वचननामा जाहीर केला आहे. माझी लढाई कुणाविरुद्ध नाही, माझी लढाई खोपोलीच्या विकासासाठी आहे, अशा शब्दांत त्यांनी मतदारांना थेट आवाहन केले.
पत्रकार साळुंके यांनी मांडलेला वचननामा खोपोलीतील क्रीडा, आरोग्य, पायाभूत सुविधा, हातगाडीधारकांचे प्रश्न, अपंगांसाठी सुविधा, स्मारक उभारणी, कर सवलत आणि नागरिकाभिमुख प्रशासन अशा विविध विकासघटकांवर आधारित आहे.
* खोपोलीच्या विकासासाठी किशोर साळुंके यांचा जाहीर संकल्प :-
- खोपोलीकरांसाठी भव्य क्रीडांगण :- खोपोली शहरात विविध खेळाडूंना एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आधुनिक सुविधा असलेले भव्य क्रीडांगण उभारण्याचा मनोदय.
- हातगाडी धारकांना स्वतंत्र हॉकर्स झोन :- बाजारपेठेतील अडचणी दूर करून हातगाडीधारकांना सुरक्षित, कायदेशीर व व्यवस्थित जागेचे नियोजन.
- अपंगांसाठी विशेष “टपरी सेवा” :- खोपोलीतील दिव्यांग नागरिकांसाठी त्यांच्या गरजेनुसार सोयी उपलब्ध करून देणारी टपरी योजना.
- खोपोलीकरांसाठी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन :- खोनपा क्रिकेट चषक, खोनपा कुस्ती चषक, कबड्डी चषक यामुळे स्थानिक क्रीडाप्रेमींना प्रोत्साहन आणि तरुणांमध्ये स्पर्धात्मकता वाढवण्याचा उद्देश.
- मोफत पार्किंग सुविधा :- वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी मोफत पार्किंगची सोय.
- बाजारातील अतिक्रमण हटाव मोहीम :- नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि खुली बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा निर्धार.
- नगरपरिषदेच्या शाळांचे पुनर्वसन :- शैक्षणिक दर्जा वाढवणे, डिजिटल सुविधा, खेळाचे साहित्य, स्वच्छता व पायाभूत सोयींचा विकास.
- अद्ययावत दवाखान्यांची उभारणी :- खोपोलीकरांसाठी परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी आधुनिक दवाखाने.
- छत्रपती संभाजी महाराज व महात्मा फुले स्मारक उभारणी :- खोपोलीत ऐतिहासिक व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा भव्य स्मारक प्रकल्प.
- दर महिन्याला ‘जनता दरबार’ :- नागरिकांच्या समस्या थेट ऐकण्यासाठी निवडून आल्यानंतर प्रत्येक महिन्याला खुले जनसंपर्क बैठकीचे आयोजन.
- पाणी समस्येवर धरण बांधणीद्वारे कायमस्वरूपी उपाय :- खोपोलीतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी दीर्घकालीन नियोजन.
- घरपट्टी व पाणीपट्टी करात ‘50% सवलत’ :- सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी अर्धी कर सवलतचा प्रस्ताव.
- पत्रकार भवनाची उभारणी व पत्रकारांसाठी निवास :- पत्रकारांच्या सुविधा वाढविण्यासाठी स्वतंत्र इमारत आणि निवासाची हमी.
- महिला बचत गटांसाठी स्टॉल उपलब्ध :- महिला सक्षमीकरणासाठी बाजारपेठेत व्यावसायिक स्टॉल्सचे वाटप.
- आकर्षक पर्यटन केंद्राची उभारणी :- खोपोली पर्यटन नकाशावर आणण्यासाठी स्वतंत्र पर्यटन केंद्र व आवश्यक सुविधा.
- बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांवर ‘छत्र उभारणी’ :- शहरातील ऐतिहासिक पुतळ्यांना भव्य छत्र, सौंदर्यीकरण व प्रकाशयोजना.
* हे आश्वासन नाही, खोपोलीकरांसाठी माझी जबाबदारी :- पत्रकार साळुंके यांनी मतदारांना आवाहन करीत सांगितले की, निवडून आलो तर माझा प्रत्येक निर्णय हा पक्षाच्या आदेशापेक्षा खोपोलीकरांच्या हितासाठी असेल. मी अपक्ष आहे, पण खोपोलीकरांचे कर्तव्यदक्ष सेवक म्हणून काम करणार आहे.

Post a Comment
0 Comments