Type Here to Get Search Results !

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची ऐशीतैशी!

* विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ - रद्दी पेपरवर खिचडी

* संग्रामपूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघड

* शासनाने दिलेल्या स्टील प्लेट्सऐवजी रद्दी पेपरचा वापर

* भोजनाच्या ठिकाणी श्वानांचा मुक्त संचार • नियमावलीचा सर्रास भंग • शिक्षण विभागाकडून चौकशीचे आदेश

बुलढाणा / अनिलसिंग चव्हाण :- बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर या आदिवासी भागात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची अक्षरशः ऐशीतैशी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राथमिक शाळेतील लहान - लहान विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून दिली जाणारी खिचडी चक्क रद्दी पेपरवर वाढली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ही योजना सुरू केली आहे. तसेच प्रत्येक शाळेला स्टीलची प्लेट्स उपलब्ध करून दिल्या आहेत, अशा स्पष्ट सूचनांसह मोठी नियमावली देण्यात आली आहे. मात्र, बावनबीर शाळेतील दृश्ये याच्या पूर्ण उलट दिसत आहेत. मुलांना रद्दी कागदावर खिचडी वाढली जात आहे, तर जेवत असताना श्वान विद्यार्थ्यांच्या अतिशय जवळ फिरताना दिसत आहेत. स्वच्छतेच्या दृष्टीने तसेच मुलांच्या आरोग्यासाठी हा गंभीर धोका असून हा प्रकार घोर निष्काळजीपणाचा उदाहरण म्हणून पाहिला जात आहे.


आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची परिस्थिती आधीच कठीण आहे. त्यात शासन योजना राबवितांना शाळा प्रशासनाने इतका अनास्थेचा कळस गाठल्याचे स्पष्ट होते. मुलांना स्वच्छ, सकस आणि सुरक्षित आहार देण्यासाठी स्पष्ट नियम असताना त्यांचे जाहीर उल्लंघन होत असल्याने पालकांमध्ये संतापाची लाट आहे.


या प्रकरणाबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी विकास पाटील यांना विचारणा करण्यात आली. त्यांनी सांगितले की, चार महिन्यांपूर्वीच जिल्ह्यातील सर्व शाळांना कडक आदेश दिले होते. तरीही अशा घटना घडत असतील तर त्यावर कारवाई आवश्यक आहे. तसेच संग्रामपूर गटशिक्षणाधिकारी दीपक टाले यांनीही तातडीने लक्ष घेऊन केंद्र प्रमुखांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.


* या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत :-

- विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी नक्की कोणाची ?

- शासनाचे आदेश आणि नियमावली पायदळी तुडवण्याची परवानगी शाळेला कोणी दिली ?

- शालेय शिक्षणमंत्री आता या गंभीर प्रकारावर कोणती कारवाई करणार?


आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि भविष्यासोबत असा खेळ होत असल्याने या घटनेवर राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकाराची सखोल चौकशी आणि संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments