* शासनाने दुरुस्ती न केल्याने नागरिकांनीच स्वखर्चाने रस्ता दुरुस्त केला
* जय हनुमान क्रीडा मंडळाच्या पुढाकारातून गावकऱ्यांचे एकत्रित प्रयत्न
* तरुणांनी साहित्याची व्यवस्था करून खड्डे भरले ; नागरिकांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
कर्जत / राजेंद्र जाधव :- वंजारवाडी ते कशेळे या मुख्य रस्त्याची अवस्था मागील काही महिन्यांपासून अतिशय दयनीय झाली होती. मोठमोठे खड्डे, सतत धुळीची उडान आणि वाढता अपघाताचा धोका यामुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही दुरुस्ती न होताच राहिल्याने नागरिकांचा संयम सुटला आणि अखेर त्यांनी स्वतःच पुढे येऊन स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे भरून काढले.
या सामाजिक उपक्रमाचा पुढाकार जय हनुमान क्रीडा मंडळ, कशेळे यांनी घेतला. मंडळाच्या आवाहनाला गावातील तरुण मोठ्या संख्येने प्रतिसाद देत एकत्र आले. रस्त्याचे साहित्य व्यवस्थापन, खड्डे भरण्याची कामे आणि वाहतुकीची काळजी असे सर्व नियोजन गावकऱ्यांनी मिळून केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे रस्त्यावरील खड्डे मोठ्या प्रमाणात भरले गेल्याने नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
या कामात जय हनुमान क्रीडा मंडळाचे आत्माराम नावजी खंडागळे (अध्यक्ष), केदार प्रकाश गावकर (उपाध्यक्ष), अरुण जयराम हरपूडे (सचिव), संजय हरिश्चंद्र जाधव (खजिनदार), मारुती पांडुरंग शेळके (सदस्य), प्रभाकर गणपत दिसले (सदस्य), दत्ता गणपत फराड (सदस्य) तसेच रामदास घरत, सचिन राणे, मंगेश म्हसे, सुधीर मते, संदीप खंडागळे, अनंता म्हसे, मंगेश फराड, रवींद्र मते, प्रतीक फराड, सुभाष शेळके, ज्ञानेश्वर शेळके, समीर शिंदे, सदानंद मते आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी पुढाकार घेतला.
गावकऱ्यांनी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. नागरिकांच्या श्रमदानाने रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती झाली असली, तरी कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करण्याची जबाबदारी प्रशासनाचीच आहे, असे नागरिकांचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून रस्ता पूर्णपणे दुरुस्त करावा, अशी एकमुखी मागणी केली जात आहे.

Post a Comment
0 Comments