* 10 वर्षीय मित चिपळूणकरचा मृत्यू : चार जणांचे जीव घेणाऱ्या आंबेपूर बाजार परिसरातील कुप्रसिद्ध विहिरीत पुन्हा दुर्घटना
आलिबाग / प्रतिनिधी :- आंबेपूर आठवडा बाजार, चंद्रमोळेश्वर मंदिराजवळील ‘शापित’ म्हणून ओळखली जाणाऱ्या विहिरीत पुन्हा एकदा जीवघेणी दुर्घटना घडली आहे. शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2025 रोजी 10 वर्षीय मित लवेश चिपळूणकर या निरागस मुलाचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, या विहिरीत यापूर्वीही किमान चार जणांचे प्राण गेले आहेत.
* हळदीसोहळ्यातून खेळत बाहेर पडला आणि थेट मृत्यूच्या विहिरीत कोसळला :- मित हा रा. जि. प. शाळा पोयनाड येथे पाचवीचा विद्यार्थी होता. शाळा सुटल्यानंतर तो वडिलांसह कोचरेकरांच्या मुलांच्या हळदीसोहळ्यास गेला होता. वडील पुन्हा वडखळमधील खानावळीत कामावर गेले आणि मित हळदीच्या मंडपात थांबला. हळद लावणाऱ्या मुलांना वाटण्यात येणारा खाऊ घेऊन मित खेळत खेळत बाहेर पडला. खेळताना तो बिनधास्तपणे कुप्रसिद्ध विहिरीजवळ गेला आणि पाय घसरून थेट खाली कोसळला.
* विहिरीत शैवाल आणि गटारपाणी :- ही विहीर वर्षानुवर्षे शैवाळांनी झाकलेली आणि गटारपाण्याने भरलेली असल्याने कोणालाही उडी मारून तात्काळ बचावकार्य करता आले नाही. लहान मुलांनी ओरडून गावकऱ्यांना बोलावले, पण तोपर्यंत परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती.
* काकांचे धाडस - पोलिसांसह बचावकार्य, पण प्रयत्न व्यर्थ :- मितचे काका चेतन चिपळूणकर धाडसाने पुढे आले. पोलिसांनी रस्सीच्या सहाय्याने विहिरीत उतरून काकांसह मितला बाहेर काढले. त्याच्या छातीतील पाणी काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. तेव्हा तो गंभीर अवस्थेत होता. प्रथम नेण्यात आले ते शिंदे हॉस्पिटलमध्ये...डॉक्टरांनी सांगितले की तो 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ पाण्यात अडकून होता. त्यांनी पुढे रेफर केले, तातडीने आलिबाग सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. मात्र, पोटात मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने मृत्यू झाल्याचे डॉंक्टरांनी घोषित केले. या घटनेने परिसरात अतीव शोककळा पसरली.
* शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार :- शनिवारी मोठ्या संख्येने नागरिकांनी मितच्या घरी जाऊन अंतिम दर्शन घेतले. गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, सातवणीचा विधी गुरुवार, 20 नोव्हेंबर 2025 सकाळी 9.30 वाजता झाला.
* विहीर तात्काळ बुजविण्याची मागणी :- चिपळूणकर कुटुंबीयांसह परिसरातील सर्व नागरिकांनी प्रशासनाला ठाम मागणी केली आहे की, ही विहीर तात्काळ बुजवावी. या विहिरीने आधीच अनेक जीव घेतले आहेत. आता आणखी एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये. नागरिकांनी ही विहीर कायमची बंद करण्यासाठी तातडीच्या निर्णयाची विनंती केली आहे. परिसरात अजूनही मितच्या मृत्यूचे दुःख दाटून आले आहे.

Post a Comment
0 Comments