Type Here to Get Search Results !

मांडवा जेट्टी - अलिबाग मार्गांवर अवजड वाहनांची वाहतूक बंदी

* अपघात कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची अधिसूचना

* सकाळी 8 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 8 या वेळेत बंदी लागू

रायगड / प्रतिनिधी :- मांडवा जेट्टी ते अलिबाग मार्गांवर वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अवजड वाहनांवरील वाहतूकबंदीची अधिसूचना जारी केली आहे. ही बंदी अधिसूचना या आदेशाच्या दिनांकापासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे.


* दिवसातून दोन वेळा वाहतूक बंदी :- अधिसूचनेनुसार मांडवा जेट्टी - अलिबाग मार्गांवर खालील वेळेत जड व अवजड वाहनांचे हालचाल पूर्णतः बंद राहील: सकाळी 8 ते दुपारी 12, सायंकाळी 4 ते रात्री 8 तथापि, खालील जीवनावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. दूध, पेट्रोल - डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला, पाणी वाहतूक करणारी वाहने तसेच पोलिस, रुग्णवाहिका आणि फायर ब्रिगेड वाहने.


* पर्यटक जिल्ह्यात वाहतूक कोंडी वाढली :- रायगड जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठ्या पर्यटक केंद्रांपैकी एक आहे. अलिबाग, मांडवा, किहिम, आक्षी आणि नागाव येथे शनिवारी - रविवारी पर्यटकांची वाहनांची प्रचंड गर्दी होते. त्यातच मांडवा जेट्टीवरून सुरू असलेली रो-रो सेवा व जलप्रवासी बोटी, मुंबईतून येणारा मोठा पर्यटक ओघ, डंपर, ट्रक, खडी–माती वाहतूक करणारी वाहने, सिमेंट मिक्सर व बांधकाम साहित्य वाहतूक या सर्वांमुळे मांडवा जेट्टी ते अलिबाग मार्गांवर वाहतूक कोंडी वाढत असून किरकोळ, गंभीर आणि प्राणांतिक अपघातांची संख्या वाढली आहे.


* रुग्णवाहिका अडून रुग्णांना धोका - विद्यार्थ्यांचा प्रवासही विस्कळीत :- अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे की, वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका मार्गांत अडकतात, त्यामुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होतो तसेच विद्यार्थी आणि पर्यटकांना प्रवासासाठी जास्त वेळ खर्च करावा लागतो. सप्ताहांतात मुंबईहून येणारी वाहनांची लांबच लांब रांग परिस्थिती अधिकच बिकट करते, यामुळे तातडीच्या उपाययोजनांतर्गत जिल्हा प्रशासनाने वाहतूक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.


* जीवनावश्यक सेवांना पूर्ण मुभा :- वाहतूकबंदीमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा येऊ नये म्हणून खालील सेवा वगळण्यात आल्या आहेत. दूध वाहतूक, पेट्रोल - डिझेल, स्वयंपाक गॅस, औषधे व ऑक्सिजन, भाजीपाला व पाणी वाहतूक, पोलिस व फायर ब्रिगेड वाहन, रुग्णवाहिका.


* अपघात कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल :- जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले की, या उपाययोजनेमुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होईल, वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळेल, स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटकांचा प्रवास सुरक्षित व सुकर होईल.

Post a Comment

0 Comments