Type Here to Get Search Results !

नमन जागराची नवीन पहाट : कोकण संस्कृतीला राष्ट्रीय मंचावर नेण्याचा नमन संस्थेचा संकल्प

* नमन लोककला संस्थेची नूतन कार्यकारिणी घोषित

* अध्यक्षपदी पुन्हा रविंद्र मटकर 2025-28 साठी सर्वानुमते निवड

मुंबई / दीपक कारकर :- कोकणच्या मातीत रुजलेली, लोककला आणि लोककलावंतांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारी अग्रगण्य संस्था नमन लोककला संस्था (रजि.), कार्यक्षेत्र - अखंड भारत हिची विशेष सर्वसाधारण सभा रविवारी (16 नोव्हेंबर ) मुंबईतील परळ येथील वाघे हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली.


या सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे विद्यमान अध्यक्ष रविंद्र मटकर यांनी भूषविले. ‘नमन महोत्सव’ राज्य पातळीवर सुरू करण्यास शासनाला भाग पाडण्यात निर्णायक भूमिका बजाविणाऱ्या या संस्थेच्या कार्याचा उपस्थितांनी गौरव केला.


* त्रिवार्षिक अहवालांना सर्वानुमते मंजुरी :- सभेच्या प्रारंभी सरचिटणीस शाहिद खेरटकर यांनी संस्थेचा मागील त्रिवार्षिक कार्य अहवाल आणि आर्थिक अहवाल सभेसमोर सादर केला. उपस्थित सदस्यांनी हे अहवाल एकमुखाने मंजूर केले. लोककलावंतांच्या न्याय मागण्यांसाठी केलेला शासनस्तरीय पाठपुरावा, सांस्कृतिक उपक्रम, प्रशिक्षण शिबिरांची मालिका आणि कोकण - मुंबई सांस्कृतिक एकात्मतेसाठी संस्थेने बजावलेली भूमिका यांना सर्वांनी दाद दिली.


* नमन जागर 2025 - 26 साठी भव्य आराखडा :- आगामी वर्षातील ‘नमन जागर 2025-26’ या राज्यभरातील सांस्कृतिक मालिकेच्या कार्यक्रमावर सभेत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये जिल्हानिहाय उपक्रम, नवोदित कलाकारांसाठी संधी, कोकण -मुंबई सांस्कृतिक दुवा बळकट करणे, पारंपरिक नमन कलेचे संवर्धन, आधुनिक माध्यमांतून नमनची नव्या पिढीपर्यंत पोहोच या सर्व बाबींचा तपशीलवार आढावा घेऊन नियोजन निश्चित करण्यात आले.


* 2025 - 2028 नूतन कार्यकारिणी जाहीर :- सभेत 2025 ते 2028 या त्रिवार्षिक कार्यकाळासाठी नूतन कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली. अध्यक्ष - रविंद्र मटकर (राजापूर), उपाध्यक्ष - रमाकांत जावळे (चिपळूण), राजाराम फापे (लांजा), सरचिटणीस - शाहिद खेरटकर (चिपळूण), सहसचिव - सुधाकर मास्कर (गुहागर), तुषार पंदेरे (लांजा), खजिनदार - दीपक कारकर (चिपळूण), सदस्य - प्रकाश मालप (रत्नागिरी), सागर डावल (गुहागर), प्रशांत भेकरे (गुहागर) ही कार्यकारिणी नमन कलेला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


* नमन ही कोकणची ओळख - लढा अधिक तीव्र होणार :- अध्यक्ष रविंद्र मटकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नमन ही लोककला म्हणजे कोकणची सांस्कृतिक ओळख आहे. ‘नमन जागर 2025 - 26’, ‘लोककलावंत परिषद’, कलावंत कल्याण योजना आणि विविध प्रशिक्षण शिबिरे लवकरच राज्यभर राबवली जातील.


तसेच ते पुढे म्हणाले की, लोककलावंतांना शासनमान्य सन्मान, सवलती, मंच उपलब्धता आणि सुयोग्य मानधन मिळवून देण्यासाठी संस्थेचा लढा आणखी तीव्र करण्यात येईल.


या सभेला मुंबई शाखा अध्यक्ष चंद्रकांत धोपट व कार्यकारिणी गुहागर शाखेचे अमित काताळे, उदय दणदणे, राजापूर शाखा मुंबई अध्यक्ष सुरेश मांडवकर, पिंकेश बापर्डेकर, नमन मंडळांचे प्रतिनिधी, कोकण - मुंबईतील अनेक वरिष्ठ व नवोदित कलाकार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


* कोकणच्या सांस्कृतिक जागराला नवी उभारी :- नमन कलेचा जागर पुनश्च उभारी देणे, लोककलावंतांच्या सामाजिक - आर्थिक हक्कांसाठी आवाज उठवणे आणि कोकण संस्कृती देशपातळीवर झळकवण्याचा दृढ निर्धार व्यक्त करत ही सभा उत्साहात पार पडली. ही सभा सर्व कलावंतांसाठी प्रेरणादायी आणि दिशा देणारी ठरल्याची एकमुखी भावना व्यक्त झाली.


Post a Comment

0 Comments