* 15 ते 18 मे कालावधीत जिल्ह्यात यलो अलर्ट
* काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
रायगड / प्रतिनिधी :- मुंबई प्रादेशिक हवामान विभागाकडून रायगड जिल्ह्यात 15 ते 18 मे 2025 या कालावधीत 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची, वीज चमकण्याची व ताशी 40 ते 50 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांनी सतर्क रहावे, काळजी घ्यावी तसेच आवश्यकता भासल्यास तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
दैनंदिन हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in// या संकेतस्थळावर दररोज उपलब्ध करून देण्यात येत आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अथवा अफवा पसरवू नये. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष 8275152363, 02141-222118 किंवा टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क करा. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
वीज चमकत असताना संगणक, टीव्ही आदी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. वीज चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. वीज चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. वीज चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरीता आपल्या मोबाईलवर 'दामिनी ॲप’ डाऊनलोड करून घ्यावे. पाऊस पडत असताना वीज चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा आपती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments