Type Here to Get Search Results !

एकेरी वाहतूक : आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी

* वाहतूक कोंडी फोडायची आहे की, खोपोलीकरांना बंदीस्त करायचे आहे ? 

* अतिक्रमण हटविण्याची हिंमत नाही मात्र छोट्याशा शहरात जागोजागी नो एंट्री ?

खोपोली बाजारपेठेतील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर खोपोली नगर परिषदेकडून उपाय योजना करण्यात येत असून त्याच अनुषंगाने खोपोली बाजार पेठ परिसरात एकेरी वाहतूक राबविण्याची संकल्पना समोर आली आहे. या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून 1 महिन्याच्या आत नागरीकांनी हरकती व सूचना लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु अजून सूचना व हरकतींसाठी वेळ शिल्लक असला तरी खोपोली नगर परिषद प्रशासनाकडून शहरात ठिकठिकाणी 'नो एंट्री'चे फलक लावण्यास सुरूवात करण्यात आली आहे. अर्थात खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉं. पंकज पाटील व खोपोली पोलिस प्रशासन बळजबरी व दमदाटी करीत शहरात 'एकेरी वाहतूक' राबविणारच असे दिसून येत आहे. 


नविन एकेरी वाहतूक संदर्भातील अधिसुचनेनुसार खोपोली बाजार पेठेमध्ये प्रवेश करण्याचे फक्त दोन मार्ग ठेवण्यात आले आहेत. यातील एक मार्ग म्हणजे खोपोली पोलिस स्टेशन समोरून आणि दुसरा मार्ग आहे वरची खोपोली मार्गे. तर बाहेर पडण्यासाठी अनेक बाजूंनी अर्थात खालची खोपोली कमानी, सिओ बंगला समोरील रस्ता, शिशु मंदिर भुयारी मार्ग...आता प्रश्न निर्माण होतो की, खोपोली बाजार पेठ परिसरात नेमकी वाहतूक कोंडी होते कुठे ? तर एक आहे दिपक हॉटेल चौक...दिपक हॉटेल चौक ते सागर प्लाझा हॉटेल पर्यंत आणि दुसरे महत्वाचे म्हणजे शाळा सुटण्याच्या वेळेस जनता स्कूल, शिशू मंदिर परिसर ते जुनी नगर परिषद पर्यंत आणि भाजी मार्केट परिसर...या भागात नेहमीच वाहतूक कोंडी असते, ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी संपूर्ण खोपोली बाजार पेठेमध्ये जाणारे रस्ते एकेरी करणे उपाय आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


खोपोली शहरात प्रवेश करण्यासाठी आज पाच ते सहा मार्ग आहेत. ज्यात खालची खोपोली कमानी, सिओ बंगला समोरील रस्ता, शिशु मंदिर भुयारी मार्ग, अरूणा बार शेजारील रस्ता, खोपोली पोलिस स्टेशन व वरची खोपोली रस्ता...आता या सर्व रस्त्यांवरील भार पोलिस स्टेशन समोरील रस्ता व वरची खोपोलीतील रस्त्यांवर टाकला जात आहे. लौजी, चिंचवली, शिळफाटा आणि खालापूर ग्रामीणमधील ग्रामस्थ हे खोपोली बाजार पेठेमध्ये प्रवेश अधिकतर खालची खोपोली कमानी मार्गांने करतात. तसेच भानवज, शास्त्री नगर आणि तत्सम परिसरातील नागरीक खोपोली पोलिस स्टेशन व सिओ बंगला समोरील रस्त्याचा वापर करतात. उर्वरीत नागरीक शिशु मंदिर भुयारी मार्ग, अरूणा बार शेजारील रस्ता व वरची खोपोली मार्गे ये-जा करतात. एकेरी वाहतूक उपक्रम राबविल्यानंतर वरची खोपोली मार्गे ये-जा करणारे त्याच मार्गे येतील-जातील पण खालची खोपोली कमानी, सिओ बंगला, शिशु मंदिर भुयारी मार्ग व अरूणा बार शेजारील रस्त्याने जाणारी वाहने खोपोली पोलिस स्टेशन मार्गे वळविण्यात येत आहेत. 


शाळा सुटण्याच्या वेळेस जनता स्कूल, शिशू मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यात आता याच मार्गे शहरातील 60 ते 70 टक्के वाहतूक बाजार पेठेमध्ये प्रवेश करणार असल्याने दिपक हॉटेल चौकात होणाऱ्या वाहतुकीपेक्षा मोठी वाहतूक कोंडी होणार नाही का ? तसेच भाजी खरेदीला निघालेल्या लोकांचाही खोपोली पोलिस स्टेशन समोर दररोज तळ निर्माण होवू शकतो. ऐवढेच नव्हे तर डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ कार्यक्रम असल्यावर वाहनांची गर्दी कशी हाताळणार ? याचा विचार करण्यात आला आहे का ? 


आता मूळ मुद्दा असा की, एकेरी वाहतूक केल्यावर खरंच खोपोली बाजारपेठेतील वाहतूक कोंडी फुटणार आहे का ? दिपक हॉटेल चौकात वाहतूक कोंडी होते कारण या चौकात चारही बाजूंनी येणारी वाहने...नंतर जवळ असलेला रिक्षा स्टँड तसेच लोकल येण्या-जाण्याच्या वेळेस प्रवाशी व वाहनांची होणारी गर्दी, आजूबाजूला विक्रीस बसणारे विक्रेते...आता एकेरी वाहतुकीने सर्वच समस्या सुटणार आहेत का ? खोपोली रेल्वे स्टेशनकडून येणारे प्रवाशी व वाहने तशीच असणार, ही वाहने जैन मंदिराकडे वळणार... डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सागर प्लाझाकडून येणारी वाहने खालची खोपोली कमानीकडे, जैन मंदिराकडे व खोपोली रेल्वे स्टेशनकडे वळणारच...आजूबाजूला विक्रीस बसणारे विक्रेते देखील असणार, मग फक्त खालची खोपोली कमानीकडून येणारी वाहने या चौकात आली नाहीत म्हणून या ठिकाणी वाहतूक कोंडी होणे बंद होईल, याबाबत नगर परिषद प्रशासन ठाम आहे का ? यानंतर रेल्वे स्टेशन येथील वाहन धारकाला शिळफाट्याकडे जातांना गल्लीबोळातून फिरून जावे लागेल, त्यातून शिशू मंदिर परिसर व खोपोली पोलिस स्टेशन, भाजी मार्केट येथे वाहतूक कोंडीत हे वाहन अडकले तर तो वाहन चालक सुटकेचा नि:श्वास कसा सोडणार...


भाजी मार्केट परिसरात होणारी गर्दी व वाहतूक कोंडी, खोपोली शहरातील एकेरी वाहतुकीतून सुटेल, असे वाटते का ? या भागात संपूर्ण खोपोलीतून नागरीक खरेदीसाठी येतात, हातगाड्या रस्त्यांवर उभ्या असतात...पार्किंग सुविधा नसल्याने जागा मिळेल तिथे वाहने लावून अथवा वाहनांवर बसूनच खरेदी केली जाते. आता एकेरी वाहतूक केल्यावर नक्की चित्र कसे पालटणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. एकेरी वाहतूक व्यवस्थेतून पार्कींगची समस्या सुटणार आहे का ? रस्त्यांवर उभ्या असलेल्या हातगाड्या कमी होणार आहेत का ? उलटपक्षी आता खोपोली पोलिस स्टेशन व शिशू मंदिर परिसरातील वाहने या गल्लीत जास्त संख्येने शिरतील, मग कोंडी फुटणार की वाढणार ? हा नेमका प्रश्न आहे. 


हा झाला वाहतुकीचा प्रश्न... उद्या खोपोली शहरातील सर्वच वाहने खोपोली पोलिस स्टेशन समोरून जाणार असल्याने सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी नाकाबंदी करीत वाहतूक शिस्तीच्या नावावर तपासणी सुरू झाल्यावर वाहन धारकांना मनस्ताप होणार, त्याचे काय ? खोपोली शहराला झालेला एक छोटासा आजार दूर करण्यासाठी अख्ख्या खोपोली शहरातील वाहतूक व्यवस्थेची शस्रक्रिया करणे कितपत योग्य आहे. एका चौकातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी संपूर्ण खोपोली शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडवून देणे शहाणपणाचे आहे का ? खालची खोपोली कमानीपासून ते दिपक हॉटेल चौकापर्यंत असलेल्या दुकानात 10 रूपयांच्या खरेदीसाठी देखील मुंबई-पुणे महामार्ग आणि संपूर्ण खोपोली धुंडाळून यावे लागणार...मग या वैतागवाडीला त्रासून नागरीकांनी इतर भागातील दुकानांवर खरेदी सुरू केल्यास या व्यवसायिकांच्या नुकसानीचे काय ? आजी-माजी नगरसेवक, नेते, सामाजिक कार्यकर्ते यांना याबाबत खरंच देणे-घेणे नाही का ? नागरीकांना होणाऱ्या त्रासाबाबत आवाज कौन उठविणार...पोलिस अधिकारी असो की, खोपोली नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी 3 वर्षांनी अथवा कधी तरी बदली होवून जाणार आहे, पण नागरी समस्यांचा त्रास हा येथील मतदार व नागरीकाला होणार आहे. 


खोपोली शहराला सध्या अतिक्रमणाच्या विळख्याने घेरले आहे. शहरातील बाजार पेठेत दुकानदारांनी मनमानी केलेले अतिक्रमण व वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे तर आता दुसरीकडे नगर परिषदेने येथून 'एंट्री' तर येथून 'नो एन्ट्री'चे झेंडे गाडण्यास सुरूवात केली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रस्त्यांवर...गटारांवर... दुकानदारांच्या वाढलेल्या अतिक्रमणामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची वाहने कुठे पार्किंग करावी ही एक मोठी समस्या झाली आहे. खोपोली शहरातील बाजार पेठेतच हॉस्पिटल असल्यामुळे आता येथून 'एन्ट्री' आणि तिथून 'नो एंट्री' हा विचार करीत हॉस्पिटलमध्ये जाणारा एखादा रुग्ण दगावल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतिक्रमण हटविण्याची हिंमत का करीत नाहीत ? रस्ते मोठे झाल्यास पार्किंगची सुविधा आपोआप होईल 'एन्ट्री' अथवा 'नो एंट्री'चा प्रश्न आपोआप सुटेल. महात्मा फुले भाजी मार्केट व पोलिस स्टेशन परिसरामध्ये असणाऱ्या रस्त्यावर हातगाड्यांच्या अतिक्रमणामुळे रस्ता अडविला गेला आहे, हे नगर परिषद प्रशासनाला दिसून येत नाही का ? शहरात जागोजागी दुकाने उभारून अतिक्रमण केले जाते, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही ? आधी अतिक्रमण हटवा त्यानंतर 'एन्ट्री' अथवा 'नो एंट्री'चे प्लॅन करा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

* नागरीकांच्या हरकती व सूचनांना केराची टोपली ? 

खोपोली नगर परिषदेकडून एकेरी वाहतूक संदर्भात अधिसूचना जारी करून 30 दिवसांत लेखी स्वरूपात हरकती व सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे, पण मुळात खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना खोपोली शहरातील नागरीकांच्या हरकती व सूचनांची गरज नसल्याचे दिसून येत आहे. कारण अजून सूचना व हरकतींसाठी जवळजवळ 13 - 14 दिवसांचा कालावधी शिल्लक असला तरी खोपोली शहरात ठिकठिकाणी 'नो एंट्री'चे फलक लावण्यात आले आहेत. 


याचा अर्थ खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना लोकशाही मार्गांवर विश्वास नाही. अजून नागरीकांच्या हरकती व सूचनांचा कालावधी शिल्लक असतांना त्यांनी मनमानीपणे या एकेरी वाहतूक उपक्रमाची अमंलबजावणी करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत.



- खलील सुर्वे 

राष्ट्रीय अध्यक्ष - न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन तथा मुख्य संपादक - साप्ताहीक खालापूर वादळ (90495 27863).

Post a Comment

0 Comments