चंद्रपूर / प्रतिनिधी :- कुटुंबातील आर्थिक परिस्थिती आणि जीवघेणा संघर्ष, दररोज होणारी ससेहोलपट, जगायचे आहे म्हणून नुसते जगणे, आस ठेवून जगणे, मनाच्या इच्छा आकांक्षा मारून जिद्दीने श्रमाने उभे राहण्याचा प्रयत्न करणारी ती रश्मिता भाष्कर गुरनुले. नवेगाव हूंडेश्वरी, नागभीडची आहे. पाच बहिणी, पाठचा लहान भाऊ, चार बहिणीचे आईने कसेबसे राबराब राबून लग्न केले. बाबा बारा वर्षापासून मानसिक विकलांग झाल्यामुळे रात्रंदिवस जिल्हा रुग्णालयातच भरती राहणारे, महिन्यासाठी औषधोपराचा हजारोंहून अधिकचा खर्च, बालपणापासून वडिलांची माया मिळालीच नाही, दोन एकर शेतात विहीर असून डिमांड भरूनही विद्युत जोडणी मिळत नाही म्हणून बाबांनी दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोन महिने खाजगी दवाखान्यात राहून चार-दोन लाख रुपये कर्ज घेत त्यांचे जीवन लग्न झालेल्या मुलीने वाचविले.
आपण शिकून कुठेतरी जॉब करावा म्हणून ती एका साध्या गावात जावून पोलीस प्रशिक्षण केले, पण कोरोना कालखंडामुळे तेही पाच-सहा महिन्यात अर्धवट सुटलेले आणि नंतर मात्र पैशाच्या अडचणीमुळे तिला कायमचे घरात रहावे लागले. मुलगी म्हणून चार भिंतीच्या आणि तालुकास्तरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेली ती रश्मिता दररोज दैनंदिन जगण्याचा संघर्ष करीत होती. अशातच लाचारीच्या जगण्यात पाचशे-हजार रुपये कुटुंबाला आधार होईल म्हणून जिल्हा परिषद शाळेत मैत्रिणीसोबत शिकवायला जावू लागली. पण पुढे चालून तेही पैसे मानधन शिक्षक देईना, सातत्याने दोन वर्ष मुलांना शिकविणे दररोज शेतीच्या कामावर मजुरीला जाणे, रोजगार हमीची कामे, मिळेल ते काम करीत स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती शोधू लागली. पाच-सहा परीक्षा दिल्या. परीक्षा फॉर्म भरायलाही पैसे नाही. परीक्षेला जायला बस तिकीटला तरी कुठून आणणार. जणू तिचे लाचारीचे जगणे सुरू होते. कुठलेही मार्गदर्शन नाही. स्पर्धा परीक्षेला ती बसलेली. घरात साधा मोबाईलही नाही. कसाबसा मोबाईल मिळाला तर रिचार्ज मारायला पैसे नाही. युट्युब (youtube) वर काही व्हिडिओ पाहून अभ्यास करू लागली. चार दोन ओळखीच्या लोकांकडून पुस्तक मिळवून ती वाचू लागली. डोळ्यात तिच्या पाणी असायचे आणि ती जीवनाची गाणी घडविण्याचा प्रयत्न करीत होती.
वनविभागाची स्पर्धा परीक्षा दिली आणि चक्क आश्चर्य. ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. मात्र, "देव देतो दैव नेतो" तिला शारीरिक चाचणीला सामोरे जायचे होते. रात्रंदिवस तीन महिने श्रम करून अगदी धावचाचणी पासून सगळे कौशल्य पारंगत झालेली आणि एके दिवशी पायाचा अपघात, बरेच दवाखाने केले पण ती धावू शकत नव्हती. तरीपण त्या लंगड्या पायांनी ती धाव चाचणीत उभी राहिली. बारा मिनिटांत तीन किलोमीटर अंतर पार करायचं होते. पण ती तिची शेवटची धाव...सतरा मिनिटे लागली. खूप खूप रडली ती. अखेर तिला या निवड यादीतून बाहेर व्हावे लागले. दवाखान्यात जायलाही पैसे नाहीत. पाय बरा करावा तरी कसा ? कोणी दिलेले ट्यूब, मलम लावून पुढे आलेल्या चार-पाचही स्पर्धा परीक्षा, पुन्हा स्वप्न बघू लागली आणि न्यायालयातील स्पर्धा परीक्षेत तिला पुन्हा गुणांक छान लाभलेले. कुठलीही शिकवणी, मार्गदर्शन नाही. मात्र, हजारो मुलांच्या या स्पर्धेत मुलाखत चाचणी अशा बाबीतून यश मिळेलच याची शाश्वती नव्हती. तिचे मन हिरमुसलेले असायचे. ती इतरही स्पर्धा परीक्षेच्या तयारी करू लागली. घरी मार्गदर्शन करणारे कोणीही नाही आणि अशातच कळले, ती न्यायालयात निवड यादीत अंतिम पात्र ठरलेली.
तिच्या या यशाबद्दल तिला शाळेने विद्यादान पुरस्कार देवून आणि महाबोधी व सम्यक बुध्द विहार नवेगाव हूंडे, गोवरपेट, सतीश गायकवाड ग्रां.प सदस्य यांनी सन्मानित केले आहे. तिला नियुक्तीबाबत आनंद की दुःख ती रात्रभर ढसाढसा रडत होती. मात्र, तिच्या जगण्याचा हा संघर्ष आता तिच्या मनातल्या आकांशाला बळ देणारा आहे. तसेच इतर स्पर्धकांनाही स्पर्धेच्या जीवनात जिद्दीने लढावयास लावणारा प्रेरणामय नक्कीच आहे. खरंतर तिच्या या परिश्रमाला, प्रामाणिक मन, जिद्दीला लाख लाख शुभेच्छा !
Post a Comment
0 Comments