* नागरिकांनी घाबरू नये - प्रशासनाचे आवाहन
मुंबई / प्रतिनिधी :- राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची कार्यक्षमतेची तपासणी आणि नागरिकांमध्ये आपत्कालीन सज्जतेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ७ मे २०२५ रोजी महाराष्ट्रात सायरन मॉक ड्रिल (Sirens Mock Drill) आयोजित करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
या दिवशी ठराविक वेळेला मोठ्याने सायरनचा आवाज देण्यात येणार असून, तो ऐकून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ही केवळ प्रशिक्षणात्मक चाचणी असून प्रत्यक्षात कोणतीही आपत्ती किंवा धोका नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
* आपत्तीच्या तयारीसाठी महत्त्वाचे पाऊल :-
सदर मॉक ड्रिलचा उद्देश आपत्कालीन परिस्थितीत विविध शासकीय यंत्रणांची तत्परता आणि प्रतिसाद क्षमता तपासणे तसेच जनतेला योग्य त्या कृतीसाठी प्रशिक्षित करणे आहे. स्थानिक पातळीवर ही मॉक ड्रिल शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, बाजारपेठा, वसाहती आदी ठिकाणी घेण्यात येणार असून संबंधित यंत्रणांकडून नियोजन करण्यात आले आहे.
* प्रशासनाची नागरिकांना विनंती :-
- सायरन ऐकून भीतीने गोंधळ उडवू नये
- ही चाचणी आहे, अफवा पसरवू नयेत
- प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे
- शक्य असल्यास सक्रिय सहभाग घ्यावा
राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी अशी मॉक ड्रिल घेतली जाते. आपत्तीच्या वेळेस नागरिक शांतपणे व शिस्तबद्ध पद्धतीने वागावेत, यासाठी अशा उपक्रमांद्वारे आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाते. या मॉक ड्रिलमध्ये अग्निशमन दल, पोलिस, आरोग्य यंत्रणा, महसूल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था यांचा समावेश असणार आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments