Type Here to Get Search Results !

दुखऱ्या वेलींचा सुगंध

मी त्या दिवशी माझ्या गावी पाटनूरला होतो. काही नातेवाईकांना भेटण्यासाठी गाडीतून कच्च्या रस्त्याने भोकरकडे निघालो होतो. डोक्यावर रणरणते ऊन. नांदेडचा उन्हाळा म्हणजे काही विचारू नका! इतके असूनही धरणांमुळे आमच्या भागात आताही नद्या वाहतात. कालवे काठोकाठ भरून वाहतात. किती कमाल आहे. जिथे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागायचे, तिथे आज पावसाळ्यासारखे पाणी वाहते. कोणत्या जन्माची ही पुण्याई असेल ? अनेक ठिकाणी पाण्याचा गैरवापर होतोय. पाण्याची प्रचंड नासाडी होते, असेही चित्र दिसते.


मजल दरमजल माझा प्रवास सुरू होता. एका ठिकाणी असे चित्र होते की, नदीला छान पाणी होते. काही महिला नदीच्या काठावर धुणे धूत होत्या. लहान मुले पाण्यात खेळत होती. एका बाजूला काही गुराखी म्हशींना धुण्याचे काम करीत होते. माझ्यातले मूल पाण्याचा आनंद घेऊ पाहत होते. मला राहवले नाही. एका झाडाखाली मी गाडी थांबवली आणि एका दगडावर टेकून नदीत पाय सोडून बसलो.


वरून रणरणते ऊन आणि खालून नदी वाहते, असे केवळ काश्मीरमध्येच असू शकते का? तिथे वरून बर्फ वितळला, की खाली स्वच्छ पाण्याची नदी वाहते. माझे लक्ष पाण्याच्या आनंदाने होणाऱ्या प्रवासाकडे होते. तितक्यात आवाज आला, 'माझे कपडे. माझे कपडे!”

त्या ओरडणाऱ्या महिलेकडे माझे लक्ष गेले. ती जिकडे हातवारे करत होती, तिकडे मी पाहिले. पाण्याच्या प्रवाहामध्ये हळुवारपणे लोखंडाचं एक टोपलं, भरलेल्या कपड्यांसह पुढे पुढे सरकत होतं. अंगावर नेसलेल्या साडीमुळे त्या बाईला फार खोल पाण्यात जाता येत नव्हते. कुणीतरी ते लोखंडाचं टोपलं बाहेर काढावं, यासाठी ती ओरडत होती. मदतीसाठी आवाहन करत होती. 


क्षणाचाही विलंब न लावता तिकडे धावत गेलो आणि ते वाहणारं टोपलं हातानं पकडलं. घाबरून गेलेल्या त्या महिलेला एकदम घाम फुटला होता. 'धन्यवाद दादा, माझे कपडे वाहून गेले असते, तर सासू माझ्यावर खूप चिडली असती' असे म्हणून ती महिला नदीपात्रातून वर निघाली. एका झाडाखाली तिने शांतपणे ते टोपलं ठेवलं आणि त्यातला एकेक कपडा काढून ती बाजूच्या दगडांवर वाळत घालू लागली. मी पाण्याच्या बाहेर आलो, तेव्हा आकाशातून आग ओकणाऱ्या सूर्यकिरणांची तीव्रता अधिकच जाणवली. मी पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी गाडीकडे वळलो. तेवढ्यात  माझं लक्ष त्या महिलेकडे गेलं. ती महिला भाकर तुकडा काढून खाण्याच्या तयारीत होती.


जाता जाता तिने मला सहज हटकलं आणि म्हणाली, 'दादा, या... दोन घास खाऊन जा. मला फारशी भूक नव्हती, पण तिच्या भाकरीवरील उडदाच्या डाळीचा खमंग वास माझ्या नाकात शिरला. उडदाची डाळ म्हणजे माझी कमजोरी. अजून एक विचार मनात आला, आपण या माउलीला नकार दिला, तर तिला काय वाटेल? शिवाय आपल्यावर बालपणी झालेला संस्कार,  'समोर आलेल्या अन्नाला कधी नाही म्हणू नये'. 

मी त्या महिलेच्या बाजूला असलेल्या दगडावर बसलो आणि तिला म्हणालो, 'द्या अर्धी भाकर…' 

त्या माउलीने एका भाकरीवर डाळ आणि आंब्याचं लोणचं टाकून ती माझ्या समोर ठेवली. मग काय विचारता ? मस्त जेवण सुरू झालं.


तिची भाकरी आणि उडदाची डाळ मला अतिशय आवडली, हे तिच्या लक्षात आलं. मग तिनं तिच्याकडं असलेली दुसरी भाकर मला दिली. ती म्हणाली, 'दादा, आता मी घरीच निघाले. घरी दुसरं काय काम हाय? भाकरी करायची न् खायची'. 

काही तरी बोलायचं, म्हणून मी सहज विचारलं, 'तुमच्या घरी कोणी नसतं का?' 

'असतात की, पण इथं कोणी राहत नाही. मुलांच्या शिक्षणासाठी सगळे शहरात असतात'. त्या माउलीनं माहिती दिली. तिनं दिलेली भाकरी - भाजी  मी आवडीनं खात होतो. दरम्यान आमच्या गप्पा सुरू झाल्या.


ती महिला कोण होती? कुठून आली? तिच्या घरी काय परिस्थिती आहे? ती सध्या कुठल्या परिस्थितीत आहे? आणि तिच्या आयुष्यात ती एकटी का आहे? प्रत्येक महिलेच्या मनात एक गंभीर महाकाव्य दडलेले असते, तसे तिच्याही होते. मी ज्या महिलेशी बोलत होतो, तिचं नाव राधिका जाधव. राधिका जाधव त्या नदीपासून जवळ असलेल्या एका वाडीवर राहतात. तीन-चारशे घरांची ती वस्ती अजूनही विकासापासून लांबच आहे.


राधिकाच्या घरी दहा एकर शेती. नवरा ब-यापैकी शिकलेला. राधिकाच्या लग्नाला आज तीस वर्षे पूर्ण झाली. पण या तीस वर्षांत राधिकाला मूलबाळ झालं नाही. डॉक्टरांच्या तपासणीनंतर लक्षात आलं, की राधिकामध्येच दोष आहे. त्यामुळे तिला मूल होणार नाही.

'माझ्या वंशाचा दिवा पाहिजे,' असा आग्रह राधिकाच्या सासूने धरल्यावर, राधिकाच्या नवऱ्याने दुसरे लग्न केले. राधिकाच्या सवतीला दोन मुले झाली. ती मुले, राधिकाचा नवरा आणि तिची सवत लेकरांच्या शिक्षणासाठी नांदेडला राहतात.


घरची शेती, सासू-सासरे, आर्थिक व्यवहार सगळे राधिकाच्या खांद्यावर आहे. राधिकाचे व्यावहारिक कौशल्य फारसे शिक्षण नसतानाही अफाट आहे. बाजारपेठेचे ज्ञान, पाहुणचार, आले गेले, सोयरेधायरे, घरचे मानपान हे सगळे तिला सहज जमते. व्यवहारातले चढउतार, नात्यांमधल्या अडचणींवर मात करण्याची प्रक्रिया यामध्ये ती माहीर आहे. पण राधिका आई बनू शकली नाही, म्हणूनच तिच्यावर गणगोतात टीका होत राहिली.  


खूप वेळ गप्पा झाल्यावर राधिका खुलून बोलायला लागली. ती म्हणाली,

'आता राधिका ऐवजी ‘वांझोटी’ हा शब्द कानाला सवयीचा झालाय. त्याचं मला काही वाटत नाही. मी स्वतःहून वांझोटी झाले का? मला मूल होऊ नये, यासाठी मी काही केलंय का? नाही ना? मग समाजातल्या बोलण्याकडं मी लक्ष का द्यायचं?' या जेमतेम शिक्षण असलेल्या बाईमध्ये इतका आत्मविश्वास आणि स्पष्टता कुठून आली असेल, हा विचार मला छळू लागला.


राधिकाचे आपल्या नवऱ्यावर अफाट प्रेम होते. पण दुसरी बायको आल्यापासून त्याचे प्रेम आटून गेले होते.

ती म्हणाली, 'समाजाचं काय... काहीही बोलतो. पण तो (नवरा) आजही सगळी जबाबदारी माझ्यावर टाकून मोकळा. कधीतरी प्रेमाने बघतो आणि त्या प्रेमाच्या नजरेसाठीच जगावेसे वाटते. त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. मी त्याचं स्वप्न पूर्ण करू शकले नाही.

तरी त्यांनी मला सांभाळले, हे काय कमी आहे?'


मी आणि राधिका बोलत असताना आणखी एक बाई  तिथे आली. ती म्हणाली,

'आला का भाऊ तुला न्यायला? तुझं बरं आहे गं. जवा वाटलं तवा भावाला बोलवतीस'. 

राधिका हसून म्हणाली,

'हा माझा सख्खा भाऊ नाही. रस्त्यानं जाणारे दादा हायीत. त्यांनी पाण्यात वाहत जाणारं माझं टोपलं काढून दिलं. मग सुकादुकाच्या गप्पा झाल्या. जेवण झालं, बस इतकंच!' 


ती दुसरी आलेली बाई माझ्या चमचमणाऱ्या बुटांकडे, पोशाखाकडे आणि गाडीकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर विचित्र अचंबा होता.

मी त्या दोघींच्या शेजारी दगडावर बसलो होतो. हातात भाकरी आणि गप्पा सुरू, हे बघून तिला आश्चर्य वाटलं.

ती बाईही आमच्या गप्पांत सामील झाली. तिचं नाव नंदा.

नंदाला पाच मुली आहेत. सहाव्यांदा गरोदर आहे. नवऱ्याला ‘मुलगाच’ हवा आहे.

मुलगा म्हणजे वंशाचा दिवा. मुलगी म्हणजे परक्याचं धन, अशा विचारानं नंदाचं सगळं कुटुंब झपाटलेलं आहे.”


मी नंदाला विचारलं, 'घरी वातावरण कसं आहे?' 

ती म्हणाली, 'काय वातावरण? राबराब राबायचं अन् मुलगा होत नाही, म्हणून रोज शिव्या खायच्या. माझी आई जिवंत होती, तवा तिला समदं सांगायचं. आता तीही नाही. वडील लहानपणीच गेले. भावाकडून काही आधार नाही.

ती म्हणाली, 'पाच गर्भ पाडले. सगळे मुलीचेच. तीन-चार वैद्य म्हणाले, यांना मुलगा होणारच नाही. तरीही सासू-सासरे ऐकत नाहीत. डॉक्टर म्हणतात, 'असं केलं, तर बाई वाचल कशी?' 


एकीकडे राधिका तिचं दुःख सांगत होती, तर दुसरीकडे नंदा. जिवंत असूनही ती रोज कसे मरण अनुभवते, हे मला सांगत होती.

राधिका म्हणाली, 'आता जगणं फक्त नवऱ्याच्या त्या एका नजरेसाठी असतं. तो कधीतरी एक प्रेमळ नजर टाकतो. माझा नवरा आजही प्रेम करत असेल.

समाज काय... कुणालाही दोष देतो. कावळेच नुस्ते!' 


नंदा पुढे म्हणाली, 'खूप वेळा वाटतं, या नदीत उडी मारावी. जीव द्यावा. पण मग मुलींचा विचार येतो. माझ्या माघारी त्यांचं कसं होईल?'

त्या दोघींच्या बोलण्यातून जे जग समोर आलं, ते मी ना कधी पुस्तकात वाचलं होतं, ना पाहिलं होतं. 

दोन वेगवेगळ्या सामाजिक त्रासांमधून रोज मरत जगणाऱ्या ह्या दोन स्त्रिया, त्यांचं दुःख कोणत्याही मापात मोजता येत नाही. 


मी उठलो आणि गाडीकडे चालायला लागलो. मी एकदा मागे वळून पाहिले, तेव्हा त्या दोघी अर्धवट वाळलेल्या कपड्यांवर दगड ठेवत होत्या, ते कपडे वा-यावर उडून जाऊ नयेत म्हणून. पण समाजाने त्यांच्यावर केलेले आरोप, त्यांची कुचंबणा, त्याला थोपवायला त्यांच्याकडे कोणताच उपाय नव्हता. कोणतंच मनोभावे वजन नव्हतं. 


राधिका आणि नंदा ह्या दोन्हीही दुखऱ्या वेली आहेत. त्यांचा कर्तृत्वाचा सुगंध दूरवर पोहोचतोय, पण आपण त्यांना आपुलकीचं पाणी घातलं नाही, तर एक दिवस ह्या वेली सुकून जातील, तो सुगंध हरवून जाईल. बरोबर आहे ना? राधिका आणि नंदा यांच्यासारख्या दुखऱ्या वेली ग्रामीण भागात तुम्हाला पावलोपावली भेटतील. त्यांना आधार द्या. त्यांचं दुःख समजून घ्या. त्यांना जर आपण दोन क्षणाचा आनंद देऊ शकलो, तर आपण खरे  'माणूस' झालो म्हणायचं. अन्यथा काही खरं नाही!

Post a Comment

0 Comments