कर्जत / नरेश जाधव :- आगामी नवरात्र उत्सव 2025 च्या पार्श्वभूमीवर कर्जत पोलिस ठाण्याच्या वतीने सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांच्या अध्यक्षांची विशेष बैठक घेण्यात आली. 19 सप्टेंबर 2025 रोजी सायं. 5.40 ते 6.30 या वेळेत ही बैठक पार पडली. बैठकीस 45 ते 50 मंडळांचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. बैठकीदरम्यान पोलिस प्रशासनाच्या वतीने उत्सव शांततेत व सुरक्षिततेत पार पडावा यासाठी विविध महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.
* सूचना पुढीलप्रमाणे :-
1. सर्व मंडळांनी “आपले सरकार” या ऑनलाईन पोर्टलवरून परवानगी अर्ज सादर करावा.
2. वर्गणी जबरदस्तीने गोळा न करण्याचे काटेकोर आदेश.
3. देवींच्या मूर्ती व मंडपाच्या सुरक्षिततेसाठी मंडळाने 24 तास स्वयंसेवकांची नेमणूक करावी.
4. देखावे, फलक वा पताक्यांमुळे कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
5. ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
6. मंडप परिसरात पुरेसा प्रकाश असावा व रोशनाईसाठी एमएसईबी (MSEB) मार्फत रीतसर परवानगी घ्यावी.
7. गरबा ठिकाणी स्वयंसेवकांची नेमणूक करून त्यांना ओळखपत्र द्यावे.
8. गरबा खेळताना धातूच्या दांडियांचा वापर न करण्याचे निर्देश.
9. स्थानिक महिला-पुरुषांचाच सहभाग ठेवावा, बाहेरील व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही.
10. मद्यप्राशन अथवा अन्य नशेत कोणी आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे.
11. शक्य तिथे गरबा ठिकाणी सीसीटिव्ही (CCTV) कॅमेरे बसवावेत.
12. गर्दीच्या ठिकाणी पर्यायी मार्ग निश्चित करून वाहन पार्किंगची सोय करावी, जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल.
13. आक्षेपार्ह गाणी, पोस्टर, फलक वा देखावे लावण्यास सक्त मनाई.
14. गरबा ठिकाणी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लक्षात घेऊन छेडछाडीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी मंडळ पदाधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी.
या बैठकीत पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की, सार्वजनिक नवरात्रोत्सव हा समाज ऐक्य व सुसंवाद वाढविणारा ठरावा, यासाठी सर्व मंडळांनी दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

Post a Comment
0 Comments