* पंचायत समिती गणासाठी शिवसेनेतून इच्छुकांची रांग
* आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या दरबारात गर्दी !
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा परिसरात सध्या दिवाळीपेक्षा राजकीय फटाके अधिक आवाजात फुटत असल्याचे चित्र आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, गावागावांत राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. शिवसेना (शिंदे गट) मध्ये उमेदवारांच्या इच्छुकतेचा महास्फोट झाला आहे. एका मागोमाग एक नावे पुढे येत असून, आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या दरबारात “मला संधी द्या” अशी मागणी घेऊन इच्छुकांची रांग लागली आहे.
राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अविनाश आबा कुडे, गणेश देशमुख, विनोद राऊळ, नामदेव विश्राम महाजन, वसीम शेख, पत्रकार सोनू परदेशी, रोशन जाधव ही नावे नगरदेवळा पंचायत समिती गणातून जोरात चर्चेत आहेत. या सर्व इच्छुकांनी आपल्या स्तरावरून प्रचारयंत्रणा सज्ज ठेवली असून, काहींनी थेट आमदार किशोर आप्पा पाटील यांची भेट घेऊन “आमच्यावर विश्वास ठेवा” अशी गळ घातली आहे, तर काहींनी शिवसेना कार्यालयात लेखी अर्ज देऊन आपली दावेदारी दाखल केली आहे. तर काहींनी “व्हाया-व्हाया” संपर्क साधून राजकीय मैदानात आपली उपस्थिती दाखवायला सुरुवात केली आहे.
* शिवसेना शिंदे गटात स्पर्धेचा ताप वाढला :- नगरदेवळा गणात यंदा सर्वाधिक इच्छुक शिवसेने (शिंदे गट) कडून असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची पंचायत समितीत पोहोचावे, यासाठी प्रयत्नांची शर्थ सुरू आहे. यामुळे पक्षात आतील चुरस, मैत्री-शत्रुत्व आणि संघटनशक्तीची कसोटी लागणार आहे. यातील कोणाला “आप्पांची कृपादृष्टी” लाभते, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होईल.
* नगरदेवळा जिल्हा परिषद गणातही चर्चांना ऊत :- दुसरीकडे नगरदेवळा जिल्हा परिषदेसाठी काही निवडक नावांवर राजकीय गलियारांत चर्चा रंगली आहे. त्यात शिवसेना नेते मनोहर गिरधर पाटील उर्फ रावसाहेब जिभू, सरदार एस. के. पवार विद्यालयाचे प्राचार्य तथा भाजप नेते किरण काटकर सर, नगरदेवळा ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच युवा नेते सागर पाटील, रवी बाबा पाटील, मुन्ना शिरूडे आदींची नावे चर्चेत आहेत. यातील काही जणांनी पक्षश्रेष्ठींशी संवाद सुरू केला असून, स्थानिक पातळीवरील गणिते आणि जातीय समीकरणे यावरही बारीक नजर ठेवण्यात येत आहे.
* तिकीट कोणाला ? सर्वांच्या नजरा आप्पांकडे :- नगरदेवळा गणातील तिकीट वाटपाचा सर्वस्वी निर्णय आमदार किशोर आप्पा पाटील घेणार आहेत. ते कोणावर विश्वास ठेवतात, कोणाला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण “आप्पांचा आशीर्वाद” मिळालेलाच उमेदवार पुढे जाऊ शकतो, हे सर्वांनाच ठाऊक आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, तिकीट एकच, पण इच्छुक सात...कोण होईल नगरदेवळ्याचा तारा?
* चहाच्या कपात राजकारण उकळतेय :- दिवाळीच्या फराळासोबत सध्या राजकारणाचाही फराळ सर्वत्र सुरू आहे. नगरदेवळ्यातील चहा टपरी, बसस्टॅंड, बाजारपेठ, गणपती दरवाज्याजवळील ठिय्या, कटींग सलून तसेच राजकीय पक्षांच्या कार्यालयांत निवडणुकीवर तुफान चर्चा रंगत आहेत. “कोणाचं वजन किती?”, “कोणाकडे आप्पांची लाइन आहे?”, “कोणावर विश्वास ठेवलं जाईल?” यावरून वाद, चर्चा, अंदाज यांच्या फटाक्यांचा आवाज दिवाळीपेक्षाही मोठा आहे.
* 'आप्पांची कृपा’ मिळवणे म्हणजे तिकीट मिळवणे :- नगरदेवळा गणात निवडणूक लढवण्याची संधी मिळवण्यासाठी नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वच स्तरावर हालचालींना वेग आला आहे. अविनाश आबा कुडे, गणेश देशमुख, विनोद राऊळ, नामदेव महाजन, वसीम शेख, सोनू परदेशी, रोशन जाधव यांच्या नावांपैकी “आप्पांची पसंती” कोणाला मिळते, हे ठरवेल नगरदेवळा गणातील शिवसेनेचे भविष्य, ऐवढे मात्र खरे!

Post a Comment
0 Comments