Type Here to Get Search Results !

कर्ज देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक

* “सिबिल खराब असला तरी लोन मिळवून देतो” म्हणत घेतले पैसे ; इन्शुरन्स कागदपत्रेही दिली नाहीत!

पुणे / विशेष प्रतिनिधी :- कोरोनानंतरच्या आर्थिक मंदीने अनेकांचे रोजगार, व्यवसाय आणि उपजीविका उद्ध्वस्त झाल्या. लहान व्यावसायिक दिवाळखोरीत गेले, अनेकांचे पगार बंद झाले, नोकऱ्या गेल्या. या संकटात जगण्यासाठी किंवा आधीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी नागरिकांनी नव्याने कर्ज घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ईएमआय वेळेवर न भरल्याने सिबिल स्कोअर (CIBIL Score) कमी झाल्याने बँक आणि पतपेढ्यांनी कर्ज देण्यास नकार दिला.

अशा हताश नागरिकांच्या भावनांचा गैरफायदा घेत, काही फसवणूक करणाऱ्या ऑनलाईन टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. “सिबिल खराब असला तरी लोन मिळवून देतो” अशा जाहिराती सोशल मीडियावर देत, या टोळ्या लोकांकडून पैसे उकळून फरार होत आहेत.


* फसवणुकीची पद्धत - विश्वास आणि दस्तऐवजांचा गैरवापर :- संशयित व्यक्ती फोन, ईमेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधतात. ते “सिबिल कमी आहे म्हणून आधी इन्शुरन्स काढावा लागेल” असे सांगून, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट, व्यवसाय परवाना, मोबाईल नंबर व ईमेल घेतात. नंतर इन्शुरन्स रकमेच्या नावाखाली हजारो रुपये ऑनलाईन मागवले जातात. पैसे पाठविल्यानंतर ना इन्शुरन्स कागदपत्र मिळतात, ना लोन प्रक्रियेचा मेसेज, ना बँकेचा कर्मचारी व्हेरिफिकेशनसाठी घरी येतो. उलट संपर्क क्रमांक बंद केले जातात, आणि हे भामटे गायब होतात.


या प्रकारातील गुन्ह्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते. कलम 406 – विश्वासघात (Criminal Breach of Trust), कलम 420 – फसवणूक (Cheating and dishonestly inducing delivery of property), कलम 468 – बनावट कागदपत्र तयार करणे (Forgery for purpose of cheating), कलम 471 – बनावट कागदपत्र वापरणे (Using forged document as genuine) तसेच हा प्रकार Information Technology Act 2000 च्या खालील कलमांमध्ये गुन्हा म्हणून गणला जातो. कलम 66C – ओळखपत्राचा गैरवापर (Identity Theft), कलम 66D – संगणक साधनांचा वापर करून फसवणूक (Cheating by personation using computer resource) यामुळे अशा फसवणुकीचे प्रकरण सायबर क्राईम आणि फसवणूक या दुहेरी गुन्ह्यांमध्ये मोडते.


* जनतेस आवाहन :-  जर कुणालाही अशा प्रकारे “इन्शुरन्स काढून लोन मिळवून देतो” असे सांगून फसवले गेले असेल, तर त्यांनी विलंब न करता स्थानिक पोलिस स्टेशन, सायबर क्राईम सेल किंवा दै. कोकण प्रदेश न्यूज (8454886853) या ठिकाणी संपर्क साधावा, अशी सूचना करण्यात आली आहे.


* मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे मागणी :-  राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा संघटित ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करून त्यांना धडा शिकवावा, अशी सर्वसामान्य नागरिकांकडून मागणी होत आहे.


* कर्जदारांच्या भावनांशी खेळ :- आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांच्या अडचणींचा गैरफायदा घेऊन फसवणूक करणारे हे रॅकेट केवळ आर्थिकच नव्हे, तर मानसिक व सामाजिक अन्यायाचे कारण ठरत आहेत. अशा गुन्हेगारांना शोधून कायद्याच्या कचाट्यात आणावे, अशी जनतेची एकमुखी मागणी आहे.

Post a Comment

0 Comments