* खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील यांचा दावा
* आगामी निवडणुकीत शेकापक्ष पूर्ण ताकदीने मैदानात
* तरुण, सुशिक्षित आणि सुसंकृत उमेदवारांना प्राधान्य
खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली, खालापूर व चौक परिसरात जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजले असून, या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) जोरदार लढत देणार असल्याचा आत्मविश्वासपूर्ण दावा तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी केला आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या सत्तेत शेतकरी कामगार पक्ष असणार आहे, हे आजच निश्चित समजा असा ठाम विश्वास व्यक्त करीत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे.
खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी स्पष्ट केले की, पक्ष इच्छुक उमेदवारांची चाचपणी करीत आहे. आगामी निवडणुकीत आम्ही सुशिक्षित, सुसंकृत आणि समाजकारणाशी बांधिलकी असलेल्या तरुणांना संधी देऊ. ही निवडणूक शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या आणि सामान्य माणसाच्या आवाजाची असेल. त्यांनी सांगितले की, पक्ष नेतृत्व व आघाडीतील चर्चा सकारात्मक दिशेने सुरू असून, जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्व घेणार आहेत.
आगामी निवडणुकीसंदर्भात शेकाप पक्षाची खालापूर तालुका आढावा बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका चिटणीस किशोर पाटील होते. या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची रणनीती ठरविण्यात आली. कार्यकर्त्यांनी एकमुखाने निवडणूक जोरदार लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीला रामभाई देशमुख, संतोष पाटील, भाई ओव्हाळ, माजी उपनगराध्यक्ष अरूण पुरी, कैलास गायकवाड, रवि रोकडे, जयंत पाठक, अबूबकर जलगावकर, भूषण कडव, प्रवीण लाले, गुरूनाथ साठेलकर, किसन विचारे, रमेश दळवी, द्वारकानाथ गावडे, हरिचंद्र कडपे, मधुकर तवले, दिपक कानकर, खंडू पाटील, परशुराम पाटील, अरुण पाटील, अनंत पाटील, धनाजी कुरंगळे, मिलिंद मुंडे, अनिल कुरंगळे आदी मान्यवर व शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत काही कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केले की, ज्यांना पक्षाने उचलून धरले, निवडणुकीत विजय मिळवून दिला, त्यांनीच नंतर पक्षाशी गद्दारी केली आहे. अशा लोकांविरुद्ध आम्ही तीव्र भूमिका घेणार आहोत. कार्यकर्त्यांनी सांगितले की, सत्तेत नसल्यामुळे कार्यकर्त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, तरीही जनतेच्या हितासाठी त्यांनी संघर्ष कायम ठेवला आहे.
* उमेदवार निश्चित होण्याच्या मार्गांवर :- खालापूर तालुक्यात सध्या 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती गण आहेत. किशोर पाटील यांनी सांगितले की, चौक जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्याबाबत थोडा संभ्रम असला, तरी पंचायत समिती गणांत आमचे उमेदवार पूर्णपणे तयार आहेत. आत्करगाव आणि खानाब पंचायत समिती गणात तर तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यांनी पुढे सांगितले की, खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 31 नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.
* जनतेचा विश्वास जिंकणे हेच ध्येय :- किशोर पाटील म्हणाले की, आम्ही राजकारणासाठी नव्हे, तर लोकांसाठी काम करण्यासाठी आलो आहोत. शेकाप हा शेतकऱ्यांचा, कामगारांचा आणि सामान्य माणसाचा पक्ष आहे. सत्तेत आलो नाही म्हणून खचायचे नाही, तर अधिक ताकदीनं जनतेशी जोडायचे. त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आश्वासन दिले की, तुमच्या समस्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवू आणि न्याय मिळवून देऊ.
* शेकाप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याची लाट :- या बैठकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे. सत्तेपासून काही काळ दूर राहिल्यानंतर पुन्हा एकदा “शेकाप सत्तेत” असा आत्मविश्वास जिल्हाभरात उमटू लागला आहे.
खालापूर तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाने मैदान सज्ज केले आहे. तरुण नेतृत्व, कार्यकर्त्यांची एकजूट आणि जनतेचा विश्वास यांच्या बळावर “शेकाप पुन्हा सत्तेत” हा नारा वास्तवात उतरणार, असा आत्मविश्वास पक्ष कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतो.

Post a Comment
0 Comments