Type Here to Get Search Results !

नगरदेवळ्यात सागर पाटील यांचे वारे !

* शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीत खलबते रंगली, तर सोशल मीडियावर ‘सागर पाटील फॉर ZP’ ची लाट!

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा गावात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अक्षरशः पेटले आहे. आरक्षणाचा तक्ता जाहीर होताच, नगरदेवळा जिल्हा परिषद गट “सर्वसाधारण” म्हणून खुला झाल्याने या जागेवर सर्वच पक्षांचे इच्छुक मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर माजी ग्रामपंचायत उपसरपंच सागर पाटील या नावाची गावात जोरदार चर्चा सुरू आहे.


गावातील चहाच्या हॉंटेलपासून नदीपात्रातील पाणवठ्यांपर्यंत एकच चर्चा सुरू आहे की, गावाचा माणूसच जिल्हा परिषदेत हवा...सागर पाटील यांनी निवडणूक लढवलीच पाहिजे. गावातील सुज्ञ नागरिकांनी स्पष्ट शब्दांत मत मांडले आहे की, पक्ष कोणताही असो, पण उमेदवार गावाचा असावा. सागर पाटील हे शिक्षित, कार्यक्षम आणि जमिनीवर काम करणारे व्यक्तिमत्त्व आहे, त्यांनीच गावाचे प्रतिनिधित्व करावे. काही तरुण कार्यकर्त्यांनी तर थेट घोषणा केली आहे की, सागर पाटील फॉर जिल्हा परिषद - हीच आमची भूमिका!


नगरदेवळा गटात सध्या शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांत प्रबळ चढाओढ सुरू आहे. गेल्या आठवडाभरात शिवसेनेकडून मनोहर गिरधर पाटील ऊर्फ रावसाहेब जिभू, किरण काटकर आणि रवी पाटील ऊर्फ रवी बाबा यांची नावे चर्चेत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अचानक सागर पाटील यांचे नाव वेगाने समोर आले आणि आता तर “गावाचा उमेदवार सागरच!” असा नारा जोर धरू लागला आहे.


सागर पाटील हे आमदार किशोर आप्पा पाटील आणि जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सक्रिय पदाधिकारी असून, त्यांनी ग्रामविकासात अनेक उल्लेखनीय उपक्रम राबवले आहेत. मात्र, चर्चेत असेही समोर आले आहे की जर त्यांना शिवसेनेतून उमेदवारी न मिळाली, तर त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी काही निवडक भाजप कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.


दुसरीकडे भाजपमध्ये सध्या किरण काटकर (सर), रविंद्र पाटील (रवी बाबा) आणि सागर पाटील या तिघांच्या नावावर खलबते रंगली आहेत. पक्षश्रेष्ठींकडून किरण काटकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरीही तरुण कार्यकर्त्यांमध्ये सागर पाटील यांच्या समर्थनाची लाट स्पष्टपणे जाणवते आहे.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपमध्ये माजी आमदार दिलीप वाघ, वैशाली सूर्यवंशी आणि अमोल शिंदे या तिन्ही नेत्यांमध्ये समन्वय राखण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप नेते मंगेश चव्हाण यांना जबाबदारी दिली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते, समन्वयक नेते व भाजपचे जुने जाणते नेते, पदाधिकारी, कायकर्ते किरण काटकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचा हट्ट करीत आहेत...पण गावातील काही नेते व कार्यकर्ते सागर पाटील यांना उमेदवारी द्यावी, यासाठी घोशा लावत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची लढत व उमेदवारीची लढाई रंगण्याची शक्यता असून सागर पाटील यांच्या निर्णयाकडे संपूर्ण नगरदेवळ्याचे लक्ष लागले आहे.


गावातील एका ज्येष्ठ नागरिकाचे म्हणणे सगळे काही सांगून जाते की, सागर पाटील हे गावाच्या विकासासाठी नेहमी धडपडतात. त्यांनी निवडणूक लढवली तर गावाचे भविष्य उज्ज्वल आहे. पण त्यांनी दबावाला बळी पडू नये.


नगरदेवळा जिल्हा परिषद गटात राजकीय समीकरणे रोज बदलत आहेत. मात्र, एक गोष्ट ठाम आहे...सागर पाटील यांचे नाव अचानक समोर आल्याने इच्छुकांमध्ये स्पर्धा तीव्र झाली असल्याचे दिसून येत आहे.


Post a Comment

0 Comments