* फटाके विक्रीतून उपजीविका नव्हे, शिक्षण व आत्मनिर्भरतेतून भविष्य उज्ज्वल घडवा!
कर्जत / प्रतिनिधी :- दिवाळीच्या सणात फटाक्यांचा झगमगाट असतो आणि त्याचसोबत काही मराठी युवक या काळात फटाके विक्रीचा व्यवसाय करून आर्थिक उभारी मिळवतात. पण गेल्या काही वर्षांपासून या पारंपरिक व्यवसायावरून काहीजण टोमणे मारताना दिसतात, मराठी मुलांनी फटाके विक्री का करावी ? त्यांनी व्यवसायात उतरू नये! अशा टिप्पण्या वारंवार ऐकायला मिळतात.
यावर साप्ताहिक रायगडचे वादळचे संपादक प्रभाकर गंगावणे यांनी समाजाला विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित केला आहे की, आपल्या मराठी मुलांनी फक्त चार दिवस फटाके विकायचे, एवढंच का ? फटाके विक्री करुच नका असे कोणीही म्हणत नाही. पण, हा व्यवसाय करताना सुरक्षितता नियम आणि कायदेशीर अटी पाळल्या गेल्या पाहिजेत, हे अधोरेखित करण्यासाठी प्रशासन किंवा माध्यमे बोलतात. कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडण्याआधी खबरदारी घेण्यात यावी, विक्री परवानगी असलेल्या ठिकाणीच दुकाने उभी रहावीत, सुरक्षित साठवणुकीची काळजी घेतली जावी - हे सगळं सांगितले म्हणजे मराठी मुलांविरोधात बोलल्याचे होत नाही. कारण, जर एखादी दुर्दैवी घटना घडली तर हेच लोक उद्या म्हणतील “मराठी मुलांनी नियम मोडले, निष्काळजीपणा केला.” म्हणूनच, अपघात टाळण्यासाठी आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी फटाके विक्री नियमानुसार करणे गरजेचे आहे.
त्यांच्या मते, फटाके विक्रीवर कोणाचे बंधन नाही, पण हा व्यवसाय करताना सुरक्षितता नियम आणि कायदेशीर अटींचे पालन करणे अत्यावश्यक आहे. कारण अपघात झाल्यास दोषही त्याच युवकांवर दिला जातो. म्हणूनच, नियम पाळून आणि जबाबदारीने विक्री करणे ही केवळ आवश्यकता नसून प्रतिष्ठेची बाब आहे.
आपल्या मराठी मुलांनी फक्त चार-पाच दिवस फटाके विकायचे, एवढेच का ? आपल्या समाजाने, स्थानिक प्रशासनाने, आणि सुजाण नागरिकांनी यापेक्षा पुढचा विचार करायला हवा. आज आपल्या तालुक्यातील किती होतकरू, हुशार मराठी युवक उच्च पदावर पोहोचले आहेत ? किती मुलांना आयएएस, आयपीएस, एमबीए, इंजिनिअरिंग, मेडिकल अशा क्षेत्रात संधी मिळाली आहे ? आज गरज आहे. गंगावणे पुढे म्हणतात की, आज आपल्या मराठी तरुणांना फटाके विक्रेत्यांपासून राष्ट्रनिर्मात्यांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.
ते पुढे सांगतात की, गावागावांत अभ्यासिका उभारल्या पाहिजेत, शैक्षणिक मार्गदर्शन केंद्रे तयार झाली पाहिजेत, आणि स्पर्धा परीक्षांसाठी मदत व आर्थिक सहाय्य दिले पाहिजे. शिक्षण, कौशल्य आणि आत्मनिर्भरतेच्या मार्गानेच मराठी मुलांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते.
फटाके विक्री ही उपजीविकेची एक शाखा असू शकते, परंतु शिक्षण, व्यवसाय आणि प्रगतीचा मार्ग हा दीर्घकालीन बदल घडवणारा असतो. मराठी मुलांनी दिवाळीत फटाके विकले तरी त्यांना कमी लेखू नका, पण त्याच वेळी त्यांना आकाशाला गवसणी घालण्यासाठी प्रेरणा द्या, असा संदेश प्रभाकर गंगावणे यांनी दिला आहे.

Post a Comment
0 Comments