* न्हावा शेवा पोलिस स्टेशनमार्फत जनतेला आवाहन
उरण / विठ्ठल ममताबादे :- न्हावाशेवा पोलिस ठाणे गुन्हा रजि क. ७१/२०२५ भारतीय न्याय सहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधांचे संरक्षण अधि. १९९९ कलम ३ प्रमाणे आरोपी अभिजीत दयानंद तांडेल व आरोपी वेदक दयानंद तांडेल दोघे राहणार सोनारी, ता. उरण जि. रायगड यांच्या विरोधात दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. द सिक्रेट ट्रेडिंग स्कीम या शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यास सांगून जनतेची कोट्यवधी रुपयाची आर्थिक फसवणूक केली आहे, त्यामुळे आर्थिक फसवणूक केल्याने अभिजित तांडेल, वेदक तांडेल यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
या दाखल गुन्हयामध्ये नमूद आरोपींनी सुरूवातीला विविध जनतेची, नागरिकांची एकूण रू.९२,००,०००/एवढ्या रकमेची फसवणूक केलेली आहे. त्यानंतर सदरच्या रक्कमेत १,३३,००,०००/(अक्षरी एक कोटी तेहत्तीस लाख) एवढी वाढ झालेली आहे. आरोपींनी ते शेअर मार्केटवर आधारीत चालवित असलेल्या बनावट द सिक्रेट ट्रेडिंग स्किममधून प्रत्येक महिन्याला १० ते १२ टक्के दराने नफा परतावा देतो असे बोलून त्यांच्या श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस सोनारी, तालुका उरण, जिल्हा रायगड येथील ऑफिसमध्ये बोलावून सन २०२१ सालापासून ते २०२४ सालापर्यंतचे कालावधीमध्ये विविध नागरिकांना, जनतेला आमिष दाखवून त्यांच्याकडे पैसे गुंतवणूक करण्यास लावून फसवणूक केलेली आहे. तरी नमूद आरोपींकडे, आरोपींचे फर्म श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस यामध्ये तसेच त्यांचे बनावट फसव्या द सिक्रेट ट्रेडिंग स्किममध्ये कोणीही पैशांची गुंतवणूक करू नये, असे आवाहन न्हावाशेवा पोलिस ठाणे (नवी मुंबई) सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज गुंड यांनी केले आहे.
कोणीही पैसे डबल करण्याचे किंवा जास्त नफा मिळवून देण्याचे कोणी आश्वासन, आमिष दाखवित असेल तर अशा गोष्टींपासून सर्वांनी लांब रहावे. अशा घटनांपासून सावध रहावे, कारण अशा जास्त नफेच्या व्यवहारातून आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून पैशाच्या बाबतीत कोणतेही व्यवहार करताना नागरिकांनी व्यवहार जपून, विचार करून करावे. द सिक्रेट ट्रेडिंग स्कीम या खोट्या फसव्या शेअर मार्केट स्कीम मध्ये कोणीही गुंतवणूक करू नये.
- मनोज गुंड, सहाय्यक पोलिस निरीक्षक, न्हावा शेवा पोलिस स्टेशन
Post a Comment
0 Comments