Type Here to Get Search Results !

डॉं. अब्दुल कलाम हे भारतासाठी अखेरच्या श्वासापर्यंत कार्य करणारे महान शास्त्रज्ञ - गुणवंत एच. मिसलवाड

* एसटी डेपो नांदेड येथे डॉं. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन - समाज व देशासाठी कार्य करण्याचे आवाहन

नांदेड / प्रतिनिधी :- भारताचे मिसाईल मॅन, माजी राष्ट्रपती व सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ भारतरत्न डॉं. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त वाचक प्रेरणा दिन, जागतिक विद्यार्थी दिन व भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो), नांदेड आगार येथे 15 ऑक्टोबर 2025 (बुधवार) रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आला होता.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस लेखापरीक्षण अधिकारी संतोष शिंगने यांच्या हस्ते डॉं. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी दिवंगत कलाम यांना अभिवादन केले.


याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले एसटी मेकॅनिक तसेच महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, डॉं. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे आपल्या देशाच्या संरक्षण, आंतरिक्ष आणि विज्ञान क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी भारतासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्य केले. ‘अग्नी-1’, ‘अग्नी-2’, ‘अग्नी-3’, ‘आकाश’, ‘नाग’ आणि ‘त्रिशूल’ या क्षेपणास्त्रांची निर्मिती करून भारत देशाचे नाव संपूर्ण जगभर गाजवले.


ते पुढे म्हणाले की, कलाम यांचं जीवन हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी दाखवलेला आदर्श म्हणजे स्वप्न बघा आणि त्यांना साकार करण्यासाठी न थकता प्रयत्न करा. समाज आणि देशासाठी कार्य करणे हीच खरी देशसेवा आहे, आणि आजच्या काळात तीच खरी गरज आहे.


विभागीय वाहतूक अधीक्षक तथा प्रभारी आगार व्यवस्थापक मिलींदकुमार सोनाळे, लेखापरीक्षण अधिकारी संतोष शिंगने, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक विष्णू हरकळ, बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, चार्जमन संदीप बोधनकर, सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, पाळी प्रमुख कैलास वाघमारे, वरिष्ठ लिपीक संतोष ढोले, सुनिता हुंबे आणि शिवचरण मळगे आदी उपस्थित होते.


याप्रसंगी रापम आगारातील अनेक कर्मचारी, कामगार, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन आणि प्रेरणादायी वातावरणामुळे उपस्थितांमध्ये देशभक्तीची आणि सेवाभावाची नवी ऊर्जा निर्माण झाली.


Post a Comment

0 Comments