* अविनाश कुडे, रोशन जाधव की सोनू परदेशी ?
* पंचायत समिती 'शिंदेसेना’चा उमेदवार कोण ?
* आप्पांच्या राजकीय डावात लपलंय मोठं रहस्य !
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा पंचायत समिती गणात यंदा राजकीय रणसंग्राम पेटला आहे. आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मैदानात महायुतीचे मित्रपक्षच आमनेसामने उभे ठाकले आहेत. शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप, आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वतंत्र उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.
या तिघा पक्षांच्या घडामोडींनी नगरदेवळ्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीकडून अभिलाषा भिला रोकडे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे समजते, तर भाजपमध्ये अनेक इच्छुकांची रांग आहे. पण खरी नजर सर्वांची लागली आहे ती शिवसेनेच्या उमेदवारीवर!
* शिवसेनेत ‘तीन दिग्गज’ आमनेसामने :- शिवसेनेच्या खेम्यातून तीन नावे चर्चेत आहेत. जेष्ठ नेते अविनाश कुडे, युवा नेते रोशन जाधव आणि पत्रकार दीपक ऊर्फ सोनू परदेशी...यातील एकावर लवकरच शिक्कामोर्तब होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या राजकीय डावपेचांमुळे या निवडीमागे मोठं ‘रहस्य’ दडलं असल्याच्या चर्चा गल्लीबोळात सुरू आहेत. एका ज्येष्ठ शिवसैनिकाने तर थेट सांगितले की, सगळ्यांना आपली उमेदवारी जाहीर करू द्या, मग शेवटी किशोर आप्पा बॉम्ब टाकतील.
* अविनाश आबा कुडे - संघटनेचा शिलेदार :- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अविनाश कुडे हे अनुभवी आणि संघटन कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. सहकार क्षेत्रात त्यांचे योगदान लक्षणीय असून, त्यांनी हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेलेच आहे. स्थानिक पातळीवर त्यांना 'शिवसेनेचे अबोल रणनीतीकार’ म्हटले जाते. अनेक नेत्यांचा आदर असलेले कुडे आबा हे “कार्यकर्त्यांचे नेते” म्हणून ओळखले जातात. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, यंदा पंचायत समिती गणात संधी मिळालीच पाहिजे. कुडे आबा यांचा सन्मान व्हावा, ही आमची भावना आहे.
* रोशन जाधव - वारसा आणि विकासाचं नवं पान :- नगरदेवळा गावातील रोशन जाधव हे सहकार महर्षी देवराम दोधा महाजन आणि शिवनारायण जाधव यांचा सहकार व राजकीय वारसा पुढे नेत आहेत. सुशिक्षित, तरुण आणि ऊर्जावान नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. रोशन जाधव यांनी आपल्या विकास आराखड्यात शिक्षण, पायाभूत सुविधा आणि ग्रामविकास या तीन सूत्रांचा विचार मांडला आहे. युवा मतदार आणि शेतकरी वर्ग त्यांच्यामागे उभा असल्याचे स्पष्ट दिसते. रोशन जाधव हे तरुणाईचं प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
* सोनू परदेशी - लेखणीचा वार, राजकारणातही धार :- पत्रकार म्हणून अन्याय, भ्रष्टाचार आणि सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेवर धारदार प्रहार करणारे दीपक ऊर्फ सोनू परदेशी यांनी आता राजकारणात प्रवेश करून स्वतःचे नाणं खणखणीत वाजवलं आहे. त्यांच्या तडफदार आणि डशिंग शैलीमुळे युवक वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला आहे. ते आमदार किशोर आप्पा पाटील यांचे विश्वासू सैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नावावर उमेदवारी मिळाली, तर प्रचार मोहिमेत “धडाकेबाज मोहीम” उभी राहणार, यात शंका नाही.
* ‘किशोर आप्पा’चा डाव - गूढ अजून उलगडलं नाही :- युवासेना विधानसभा प्रमुख या जबाबदारीपर्यंत पोहोचलेल्या किशोर आप्पा पाटील यांनी नुकतेच मोठे राजकीय संकेत दिले आहेत. त्यांच्या या नेमणुकीमागे राजकीय रणनीती आणि पुढील निवडणुकीचा डाव लपलेला असल्याचे बोलले जाते. आप्पा सध्या सर्व उमेदवारांना आपली उमेदवारी जाहीर करू देत आहेत, आणि मग शेवटी “बॉम्ब टाकतील” अशी चर्चा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे!
शिवसेना शिंदे गटाने यावेळी एकच घोषणा केली आहे की, उमेदवार कोणताही असो, तो आमदार किशोर आप्पा पाटील यांचा शिलेदार असेल. सर्व इच्छुकांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार केला आहे. पक्षाच्या धनुष्यबाणाला विजय मिळवून देण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. नगरदेवळा पंचायत समिती गणाची ही निवडणूक केवळ स्थानिक लढाई नाही, ही आहे सहकार, संघटन, लेखणी आणि तरुणाईच्या शक्तीची चुरस. शिवसेनेच्या त्रिकुटात कोण जिंकणार ? हा प्रश्न अजूनही अधांतरी आहे, पण एवढं नक्की शेवटी आप्पा बोलतील...आणि सगळं चित्र बदलून जाईल.
Post a Comment
0 Comments