* माहिती लपवणाऱ्यांविरोधात पत्रकारांचा इशारा : 26 जानेवारीपासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाची चेतावनी
खोपोली (जि. रायगड) / प्रतिनिधी :- मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर गेल्या दहा वर्षांत (1 जानेवारी 2015 ते 30 सप्टेंबर 2025) हजारो अपघात झाले, शेकडो लोक मृत्युमुखी पडले, अनेक जखमी झाले... परंतु या अपघातांमागील सत्य, आकडेवारी आणि पोलिसांकडे जमा झालेल्या मुद्देमालाबाबत शासन व प्रशासन ‘मौन’ का बाळगते आहे? हा प्रश्न आता थेट पत्रकार संघटनांनी शासनासमोर उपस्थित केला आहे.
* पत्रकार खलील सुर्वे यांचे शासनाकडे निवेदन :- “न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन” आणि “डिके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस” या दोन संघटनांच्या वतीने पत्रकार खलील सुर्वे यांनी केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलिस महासंचालक, कोकण परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांना विस्तृत निवेदन पाठवले आहे.
या निवेदनात त्यांनी 2015 ते 2025 दरम्यान खोपोली, खालापूर, बोरघाट, रसायनी व कर्जत पोलिस स्टेशन हद्दीत झालेले सर्व अपघात, मृत व जखमींची संख्या, अपघातग्रस्त वाहनांचे क्रमांक, जप्त मुद्देमाल, तसेच संबंधित सर्व एनसी, एफआयआर, पंचनामे यांची प्रती मागितली आहेत.
पत्रकार सुर्वे यांनी शासनाला 15 जानेवारी 2026 पर्यंत ही माहिती सादर करण्याची मुदत दिली असून, त्यानंतरही माहिती न दिल्यास 26 जानेवारी 2026 (प्रजासत्ताक दिन) पासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
* सत्य दडवले, तर उपोषण निश्चित - पत्रकारांचा इशारा :- या निवेदनावर पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव, पत्रकार मानसी गणेश कांबळे, पत्रकार सुधीर गोविंद माने, पत्रकार फिरोज पिंजारी, आणि पत्रकार सुधीर देशमुख यांचीही स्वाक्षरी आहे. सदर पत्रकारांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जर माहिती लपवली गेली, किंवा अपघात प्रकरणातील गैरप्रकार झाकले गेले, तर आम्ही न्यायालयीन लढाई लढू. शासन व पोलिस प्रशासन यांना वेळेत सत्य सादर करण्याची ही शेवटची संधी आहे.
* ‘सत्य’ उघडकीस येणार का ? :- पत्रकार संघटनांच्या मते, गेल्या काही वर्षांत महामार्गावरील अपघातांमध्ये संशयास्पद बाबी वाढल्या आहेत. काही अपघातांची चौकशीच झाली नाही, काहींचे मुद्देमाल गायब आहेत, तर काही प्रकरणांत प्रभावशाली व्यक्तींना वाचविण्याचे आरोप आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ही चळवळ जनतेच्या सुरक्षेसाठी आणि पारदर्शक प्रशासनासाठी उभी राहिली आहे.
* जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्यांना जबाबदार धरलेच पाहिजे - पत्रकार खलील सुर्वे :- पत्रकार सुर्वे यांनी निवेदनात म्हटले आहे की, रस्त्यावर दररोज जीव जात आहेत. पण किती अपघात झाले, किती लोक मरण पावले, कोण जबाबदार आहे, याचे पारदर्शक उत्तर कुणी देत नाही. शासनाने आता या मृत्यूंचा हिशेब द्यायलाच हवा, आम्ही सत्य मिळेपर्यंत लढत राहू.
महामार्ग हा विकासाचा जीवधन असतो, पण त्या महामार्गांवर दररोज होणारे अपघात ही विकासाची किंमत ठरू नये. पत्रकारांनी घेतलेले हे पाऊल सत्यासाठीची जबाबदार चळवळ आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी आणि जबाबदार प्रशासनासाठी शासनानेही आता डोळे उघडावे, एवढीच अपेक्षा, असेही पत्रकार सुर्वे म्हणाले.
Post a Comment
0 Comments