* भजनी मंडळांच्या गौरव सोहळ्याने साजरा होणार जनसेवेचा उत्सव!
* विक्रम यशवंत साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचा उपक्रम
खोपोली / प्रतिनिधी :- विक्रम साबळे फाउंडेशनच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष विक्रम यशवंत साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमामुळे खोपोलीत समाजसेवेचा सुंदर उपक्रम आकारास येत आहे. मेडिकव्हर हॉस्पिटल, खारघर (नवी मुंबई) यांच्या सहकार्याने हे शिबिर रविवार, 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत महाराजा मंगल कार्यालय, गुडलक कॉर्नर, खोपोली येथे होणार आहे.
आरोग्य शिबिरात विविध वैद्यकीय तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. त्यात रक्तदाब (BP), डोळे, वजन आणि उंची तपासणी, इसीजी, रक्तातील साखर (शुगर) तपासणी, लिपिड आणि सिरम क्रिएटिनिन प्रोफाइल, डॉक्टरांचे मोफत सल्ला या तपासण्यांचा समावेश असून, ‘संजिवनी लॅब खोपोली’ यांच्या माध्यमातून ही सेवा दिली जाणार आहे.
शिबिरात एकाच वेळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदानाद्वारे समाजातील गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे, या हेतूने विक्रम साबळे फाउंडेशनने हा उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या समाजोपयोगी कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
* खोपोलीतील भजनी मंडळांचा सन्मान :- या प्रसंगी खोपोली शहरातील भजन मंडळांचा विशेष सन्मान सोहळा देखील होणार आहे. सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या कलाकारांचा गौरव करून समाजात सकारात्मकता आणि एकतेचा संदेश देण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम यशवंत साबळे यांनी म्हटले आहे की, माझा वाढदिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे समाजासाठी काहीतरी करणे होय. आरोग्य, रक्तदान आणि संस्कृती या तीनही क्षेत्रांत सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येकाने आपल्या परीने समाजासाठी काहीतरी देणे हीच खरी आपली ओळख आहे.
आरोग्य, रक्तदान आणि संस्कृती, या त्रिवेणी संगमातून विक्रम साबळे फाउंडेशनचा उपक्रम खोपोली शहरासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. भक्ती, आरोग्य आणि जनसेवेचा हा संगम म्हणजे समाजबंध अधिक घट्ट करणारा उत्सव आहे.

Post a Comment
0 Comments