अलिबाग / ओमकार नागावकर :- रायगड जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांचा निवडणुकीचा मार्ग अखेर खुला झाला आहे. 13 रोजी पार पडलेल्या आरक्षण सोडतीनंतर अनेक इच्छुकांच्या नशिबाची लॉटरी लागली, तर काहींच्या आशांवर आरक्षणाची मर्यादा पडली. मात्र, या सगळ्या घडामोडींमध्ये सुरेंद्र म्हात्रे यांच्यासाठी राजकीय समीकरणं अनुकूल ठरल्याचं स्पष्ट दिसत आहे.
मागील जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून प्रभावी भूमिका बजावणारे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, दृढ नेतृत्व, लोकाभिमुख धोरणं आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यासाठी ओळखले जातात. आगामी निवडणुकीत “शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा रायगड जिल्हा परिषदेत फडकवू” असा आत्मविश्वास शिवसैनिकांमध्ये ओसंडून वाहत आहे.
शिवसेनेचा झेंडा जनतेच्या मनात पुन्हा रुजविण्याच्या तयारीला वेग आला असून, पक्षांतर्गत संघटनाही सज्ज झाली आहे. सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली विकास, पारदर्शकता आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट लढा या तत्त्वांवर आधारित प्रचार मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, रायगडच्या आरक्षण सोडतीने फक्त मतदारसंघांचे गणित नाही, तर सत्तासमीकरणांचं गणितही बदललं आहे आणि या समीकरणात सुरेंद्र म्हात्रेंची ताकद पुन्हा एकदा निर्णायक ठरणार आहे.
Post a Comment
0 Comments