Type Here to Get Search Results !

घरगुती फराळाला ग्राहकांची पसंती २६ लाख १६ हजार ४०० रुपयांची विक्री

रायगड-अलिबाग / प्रतिनिधी :- सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम चालू असून रायगड जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता समूहांनी बनविलेल्या फराळाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले  व प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांच्या संकल्पनेतून तालुका प्रभाग व ग्रामस्तरावर दिवाळीनिमित्त स्टॉल्स उभारण्यात आले असून जिल्ह्यात महिला स्वयंसहाय्यता समूहाने बनविलेल्या दिवाळी फराळ, सजावटीचे साहित्य,कंदील, पणत्या, सुगंधी उटणे यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 

      

कोकण भवन येथे विभागीय आयुक्त कोकण विभाग डॉं. विजय सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते या स्टॉलचे उद्घाटन झाले. याप्रसंगी कोकण भवन सीबीडी बेलापूर येथील सर्व अधिकारी वर्गाने आपल्या स्वयंसहाय्यता समूहांनी बनवलेल्या फराळाचा आस्वाद घेऊन मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिली.

     

स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने तसेच समूहांचे उत्पन्न वाढीस चालना मिळावी, यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्यस्तरावर मुंबई येथे मंत्रालय, कोकण भवन सीबीडी बेलापूर व उमेद कार्यालय येथे सुद्धा महिलांचे दिवाळी फराळाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉलला विभागीय कार्यालयाच्या प्रांगणात व राज्य अभियान व्यवस्थापन कक्षामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यानिमित्ताने महिलांना घरगुती फराळाच्या ऑर्डर सुद्धा मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत. मंत्रालय प्रांगणामध्ये विविध अधिकारी व मंत्रिमंडळ यांनी स्टॉलला भेट दिली व महिलांना प्रोत्साहित केले. 

     

जिल्ह्यातील प्रभाग संघ स्तरावर व पंचायत समिती प्रांगणामध्ये तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने स्टॉलचे आयोजन करण्यात आले. येथेही मोठ्या प्रमाणात महिला स्वयंसहाय्यता समूहांना ग्राहकांचा, अधिकारी वर्गांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला घरगुती चव व महिलांनी बनवलेली रुचकर पदार्थ यामुळे महिलांना दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळत आहेत महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या  माध्यमातून सदरच्या ऑर्डर दिवाळीपूर्वी पूर्ण करून ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवतील. जिल्ह्यात एकूण २५७ स्वयंसहाय्यता समूहांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.

Post a Comment

0 Comments