* विद्यार्थी - पालकांचा उत्स्फूर्त सहभाग ; खाद्य जत्रेमध्ये विद्यार्थ्यांची सर्जनशीलता खुलून उमटली
* बिरसा मुंडा जयंतीनिमित्त नववीच्या विद्यार्थ्यांची प्रभावी नाटिका आकर्षणाचा केंद्रबिंदू
कर्जत / प्रतिनिधी :- केईएस इंग्लिश मीडियम स्कूल, कडाव येथे 14 नोव्हेंबर 2025 रोजी बालदिनानिमित्त विविध उपक्रमांनी भरलेला भव्य फनफेअर - खाद्यजत्रा महोत्सव उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या आनंदोत्सवाला आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे सेक्रेटरी गांगल सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका वृषाली वैद्य आणि इन्चार्ज शिवनाथ जोशी उपस्थित होते.
ही खाद्यजत्रा सर्व विद्यार्थ्यांकरीता तसेच पालकांसाठी खुली ठेवण्यात आली होती. इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत स्वतः तयार केलेले आणि आकर्षक सजावट असलेले खाद्यपदार्थ सादर केले. विद्यार्थ्यांची कल्पकता, पदार्थांची स्वच्छ मांडणी, रंगतदार स्टॉल्स शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन या सर्व गोष्टींमुळे खाद्यजत्रा विशेष आकर्षण ठरली. पालकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावून विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
या फनफेअरसोबतच आदिवासी जननायक वीर बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त “जनजातीय गौरव दिवस” विशेषतः साजरा करण्यात आला. यासाठी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी एक प्रभावी नाटिका सादर केली. नाटिकेतून बिरसा मुंडा यांचे शौर्य, स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान, आदिवासी समाजासाठी दिलेले नेतृत्व यांचे संदेश प्रभावीपणे पालक आणि उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात आले.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालकवर्ग यांच्या सक्रिय सहभागामुळे शाळेचा परिसर दिवसभर उत्साह, आनंद आणि रंगतदार उपक्रमांनी उजळून निघाला. खाद्य जत्रेतून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, नेतृत्वगुण आणि टीमवर्क दिसून आले, तर जनजातीय गौरव दिनाच्या नाटिकेद्वारे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मूल्यांना उजाळा मिळाला. केईएस इंग्लिश मीडियम स्कूल, कडाव येथे आयोजित केलेला हा संपूर्ण फनफेअर उपक्रम अत्यंत यशस्वी आणि संस्मरणीय ठरल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले.

Post a Comment
0 Comments