खालापूर / प्रतिनिधी :- 14 नोव्हेंबर रोजी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बालदिनाचे औचित्य साधून नागरी सामाजिक विकास संस्थेतर्फे तांबटी ग्रामपंचायतीतील ठाकरवाडी येथील अंगणवाडी आणि तांबटी गावातील प्राथमिक शाळेत विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बालकांना खाऊ, भेटवस्तू वाटप करण्यात आले तसेच नेहरू जयंतीनिमित्त केक कापून छोट्या मुलांसोबत बालदिन आनंदात साजरा करण्यात आला.
अंगणवाडी आणि रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. लहान मुलांसाठी खाऊ, आकर्षक भेटवस्तू, केक वाटप असे विविध उपक्रम राबविण्यात आले. चाचा नेहरू हे बालप्रेमी नेता म्हणून ओळखले जातात. मुलांकडे पाहताच त्यांच्यात रमून जाण्याची त्यांची शैली, तोच आनंद आणि निरागस उत्साह तांबटीच्या छोट्या बालकांमध्येही दिसून आला. कार्यक्रम बालकांसाठी खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमास नागरी सामाजिक विकास संस्था अध्यक्षा वर्षा राजेश मोरे, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कदम, झेडपी प्राथमिक शाळा तांबटी शिक्षक बाळासाहेब श्रीमंतराव पाटील, अंगणवाडी सेविका रोहिणी बामणे, मदतनीस जयश्री दळवी, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण आणि उत्साहपूर्ण झाला.
नागरी सामाजिक विकास संस्थेच्या महिला सदस्यांनी देखील कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. यात परवीन शेख, सुप्रिया देशमुख, प्रतिक्षा बापर्डेकर, अनुराधा चौरे, योगिता देशमुख, लीना जोशी, ज्योती भुजबळ स्वाती डाले आदींचा समावेश होता. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या अध्यक्ष वर्षा मोरे यांनी सर्व मान्यवर, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य तसेच मुलांच्या पालक व ग्रामस्थांचे आभार मानले.

Post a Comment
0 Comments