Type Here to Get Search Results !

पाचोरा आणि मुक्ताईनगरात नगराध्यक्षपदासाठी शिवसेना विरुद्ध भाजप

* शिंदे गटाने आमदार पाटील व चंद्रकांत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली

* भाजपने शक्तीप्रदर्शन करीत प्रतिष्ठा पणाला ; दोन्ही ठिकाणी द्विपक्षीय काट्याची टक्कर

जळगाव / प्रतिनिधी :- जिल्ह्यातील अनेक नगर परिषदांमध्ये अर्ज माघारीनंतर तिरंगी - चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होत असतांना पाचोरा आणि मुक्ताईनगर येथे मात्र नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजप यांच्यात थेट आणि द्विपक्षीय प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे. दोन्ही ठिकाणी विकास, स्थानिक नेतृत्वाची ताकद आणि राजकीय वजन या सर्वांचा कस लागणार आहे.


* पाचोरा : सुनिता किशोर पाटील विरुद्ध सुचेता दिलीप वाघ :- पाचोऱ्यात छाननीअंती नगराध्यक्षपदासाठी तीन अर्ज पात्र होते. मात्र, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) च्या जया पाटील यांनी अर्ज माघारी घेतल्याने आता लढत शिवसेना (शिंदे गट) सुनिता किशोर पाटील व भाजप सुचेता दिलीप वाघ अशी राहिली आहे. ही लढत प्रत्यक्षात आमदार किशोर पाटील (शिंदे गट) विरुद्ध माजी आमदार दिलीप वाघ (भाजप) अशी बनली आहे. दोन्ही बाजूंचे राजकीय अस्तित्व आणि प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.


* सुचेता वाघ यांचा प्रचार आक्रमक :- भाजपने पाचोरा नगर परिषदेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कोणतीही कसर ठेवलेली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करतांना सुचेता वाघ यांनी शहरात काढलेल्या भव्य फेरीत भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.


* आमदार पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी :- शिंदे गटाने नगर परिषद निवडणुकांसाठी प्रभारी ठरवताच पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर व शेंदुर्णी या नगर परिषदांचे नेतृत्व आमदार किशोर पाटील यांच्यावर सोपवले आहे. यामुळे आमदार पाटील यांचे राजकीय वजन वाढले आहे. त्यामुळे भाजप नेते मंत्री गिरीश महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांना थेट ‘शह’ मिळाला असून भाजपच्या गोटात तणाव वाढल्याचे जाणवत आहे.


* मुक्ताईनगर : संजना पाटील विरुद्ध भावना महाजन :- मुक्ताईनगरातही शिवसेना (शिंदे गट) व भाजप यांच्यात थेट सामना रंगणार आहे. लढत शिवसेना (शिंदे गट) संजना चंद्रकांत पाटील व भाजप भावना ललित महाजन अशी आहे. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजपला आव्हान देण्यासाठी आपल्या मुलीला उमेदवारी दिल्याने ही लढत अधिकच रोचक बनली आहे.


* खडसे - पाटील वादाचा ताजा अध्याय :- शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी घेतलेल्या ‘सोयीस्कर’ भूमिकेवर आमदार पाटील यांनी थेट टीका केली. त्यांनी आरोप केला की, एकनाथ खडसे हे सोयीनुसार भूमिका बदलून शरद पवार गट संपविण्याच्या प्रयत्नात आहेत. या वक्तव्यामुळे मुक्ताईनगरच्या राजकारणात नव्या वादाची भर पडली आहे.


* भाजपचा प्रतिष्ठेचा प्रश्न - रक्षा खडसे यांचा प्रभाव :- भाजप उमेदवार भावना महाजन यांच्या निवडणुकीला केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनीही प्रतिष्ठेची लढत बनविल्याने मुक्ताईनगरातील राजकीय तापमान चढले आहे.


पाचोरा : सुनिता पाटील (शिंदे गट) VS सुचेता वाघ (भाजप), मुक्ताईनगर : संजना पाटील (शिंदे गट) VS भावना महाजन (भाजप) या दोन्ही ठिकाणी स्थानिक नेतृत्व, राजकीय अस्तित्व, पक्षांतील अंतर्गत राजकारण, विकासाच्या दाव्यांची चुरस यांचा थेट संघर्ष पहायला मिळणार आहे. पाचोरा आणि मुक्ताईनगरमध्ये होणारी ही शिंदे गट - भाजप थेट लढत जिल्ह्यातील सर्वात रोचक आणि प्रतिष्ठेची निवडणूक ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments