* उमेदवारांसोबत शक्तीप्रदर्शनाची तयारी
* उद्या 17 नोव्हेंबर रोजी शक्तीप्रदर्शन सभा
* खोपोली नगर परिषद निवडणूक 2025
खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या तोंडावर महायुतीने (शिवसेना - भाजप - आरपीआय) उमेदवारांच्या अर्ज दाखल मोहिमेला जोरदार प्रारंभ देत आपली ताकद दाखवून दिली आहे. “जनतेचा विश्वास… विजयाचा गुलाल!” या घोषवाक्यांसह शहरात उत्साही वातावरण निर्माण झाले असून नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
सोमवार, 17 नोव्हेंबर रोजी शिळफाटा येथे महायुतीची शक्तीप्रदर्शन सभा होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना नेते आमदार महेंद्र थोरवे, भाजप नेते आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, आरपीआय (RPI) जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत. या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमामुळे महायुतीची संघटित ताकद आणि आगामी निवडणुकीतील तयारी अधोरेखित होत आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून रॅलीद्वारे महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदिपक शेंडे आणि सर्वच 15 प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार आपापले अर्ज दाखल करणार असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना (शिंदे) गटाचे खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील, भाजप खोपोली शहर मंडळ अध्यक्ष अजय इंगुळकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) खोपोली शहर अध्यक्ष नितीन वाघमारे आदींनी केले आहे.
या कार्यक्रमाबाबत निमंत्रकांकडून निवडणुकीच्या तयारीबाबत विशेष संदेश देण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणे हा निवडणूक प्रवासाचा प्रारंभ आहे ; मात्र विजय मिळवणे हेच आपले ध्येय असेल.
खोपोलीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असल्याचा दावा करण्यात आला असून उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमात होणाऱ्या उपस्थितीमुळे आगामी निवडणुकीत महायुतीचा आत्मविश्वास अधिक दृढ झाल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Post a Comment
0 Comments