* अनेक वर्षांची मागणी पूर्ण, शिवभक्तांमध्ये उत्साहाची लाट
* नेताजी पालकरांच्या जन्मभूमीत शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उभारणी
* सुधीर ठोंबरे व मोतीराम ठोंबरे यांचा स्वखर्चाचा संकल्प कार्यरूपात
खालापूर / अर्जुन कदम :- चौक या ऐतिहासिक गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उभारणीला आज औपचारिक सुरुवात झाली. ऐतिहासिक दगडी शाळेच्या आवारात झालेल्या भूमिपूजन सोहळ्यामुळे चौकवासीयांची अनेक प्रतीक्षा पूर्ण झाली असून शिवभक्त, शिवप्रेमी आणि ग्रामस्थांमध्ये उत्साह आणि अभिमानाचे वातावरण पसरले आहे.
* उंबरखिंडच्या पराक्रमाची साक्ष देणारे चौक गाव :- २ फेब्रुवारी १६६१ रोजी झालेली उंबरखिंडची ऐतिहासिक लढाई मराठा साम्राज्याच्या युद्धकौशल्याचे सर्वोत्तम उदाहरण मानली जाते. या लढाईत छत्रपती शिवाजी महाराज व सरनोबत नेताजी पालकर यांनी फक्त १००० मावळ्यांची फौज घेत २०,००० मुघल सैन्याचा पराभव करून इतिहास घडविला. नेताजी पालकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौक गावात इतिहासाची परंपरा जपत शिवस्मारक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती. आज ती मागणी पूर्ण होत असल्याने शिवभक्तांमध्ये प्रचंड आनंद आहे.
* ठोंबरे परिवाराचा स्वखर्चातील शिवकार्य संकल्प :- भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे आणि रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य मोतीराम ठोंबरे यांनी स्वखर्चाने हे भव्य शिवस्मारक उभारण्याचा संकल्प केला आहे. स्मारकाचे भूमिपूजन चौक सरपंच रितू ठोंबरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
मोतीराम ठोंबरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे चौकच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक ठरणार आहे. हिंदवी स्वराज्याच्या कार्याची आठवण पुढील पिढ्यांना देणे हे आमचे कर्तव्य आहे.
सुधीर ठोंबरे यांनी सांगितले की, हे शिवस्मारक तरुणांमध्ये प्रेरणा, स्वाभिमान व ऊर्जेची भावना निर्माण करणारे ठरेल. शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचावा हीच भूमिका आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यास मोठ्या संख्येने शिवभक्त आणि मान्यवर उपस्थित होते. त्यात लोकनेते जगदीश हातमोडे, उपसरपंच पूजा हातमोडे, ज्येष्ठ नेते विनोद भोईर, गिरीश जोशी, सुभाष पवार, नयना झिंगे, वृषाली पोळेकर, राजन गावडे, प्रदीप गोंधळी, गुड्या देशमुख, सागर ओसवाल, ग्रामपंचायत अधिकारी गणेश मोरे, सचिन साखरे, अजिंक्य देशमुख, शरद पिंगळे, वसंत देशमुख, चौकचे व्यापारी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ यांचा समावेश होता. शिवप्रेमी तरुणांनी जयघोष करून उत्सवाचे वातावरण अधिक रंगतदार केले.
* शिवस्मारक - चौकचा ऐतिहासिक अभिमान :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि नेताजी पालकरांच्या रणनितीची आठवण जपणारे हे स्मारक भविष्यकाळात चौकचे ओळखचिन्ह ठरणार आहे. या उपक्रमामुळे चौकच्या इतिहासाला योग्य न्याय मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments