Type Here to Get Search Results !

'व्हॉईस ऑफ मीडिया’ने राज्यातील पत्रकारितेला नवी दिशा द्यावी - हरिभाऊ बागडे

* पंढरपूरमध्ये राज्य शिखर अधिवेशन उत्साहात ; दोन हजार पत्रकारांची हजेरी, सन्मान - मार्गदर्शन आणि 15 ठरावांसह कार्यक्रम संपन्न 

सोलापूर - पंढरपूर / अनिल पवार :- माध्यमे सक्षम असतील तरच लोकशाही अधिक मजबूत होते. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’सारख्या संस्थांनी सत्य, पारदर्शकता आणि नीतिमत्ता कायम राखत पत्रकारितेला नवी दिशा देणे आज काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.

‘व्हॉईस ऑफ मीडिया - व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम'चे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन पंढरपूरमध्ये अतिशय उत्साहात पार पडले. राज्यभरातून तब्बल 2 हजार पत्रकारांनी हजेरी लावल्याने अधिवेशनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.


* पत्रकार हे लोकशाहीचे प्रहरी - बागडे :- समारोप सत्रात बोलताना राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले की, आज पत्रकारिता फक्त बातमीपुरती मर्यादित नाही; समाजातील अन्याय, प्रश्न आणि वेदना यांना आवाज देण्याची ती पवित्र जबाबदारी पार पाडते. तरुण पत्रकारांनी निर्भयपणे प्रश्न विचारण्याची परंपरा पुढे नेली पाहिजे. राज्यातील पत्रकारांचा उत्साह पाहता महाराष्ट्राची पत्रकारिता नव्या उंचीवर पोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


* भक्ती - देशभक्तीची संगीतमय मेजवानी :- कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिद्ध गायक - गीतकार अतुल दिवे यांच्या ‘भक्ती आणि देशभक्ती’ या विशेष प्रस्तुतीने झाली. उद्घाटन सोहळ्यास प. पु. लोकनाथ स्वामी महाराज, प. पु. प्रल्हाद दास, सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हणमंतराव पाटील आदी उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते राणा सूर्यवंशी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.


* जीवनगौरव पुरस्कार 2025 - दिग्गज पत्रकारांचा सन्मान :- अधिवेशनातील प्रमुख आकर्षण ठरलेला ‘व्हॉईस ऑफ मीडिया जीवनगौरव पुरस्कार 2025’ देशातील नामांकित संपादकांना प्रदान करण्यात आला. श्रीकृष्ण चांडक, उत्तम कांबळे, मृणालिनी नानिवडेकर, रवींद्र अंबेकर, विशाल पाटील तसेच समाजसेवा आणि वैभवशाली भक्ती वारसा जपल्याबद्दल प. पु. लोकनाथ स्वामी महाराज यांना ‘भूवैकुंठ सेवा - आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.


* पाच पुस्तकांचे आणि स्मरणिकेचे प्रकाशन :- पत्रकार संदीप काळे लिखित खालील पाच पुस्तकांचे प्रकाशन अधिवेशनात झाले. पत्रकारितेमधील व्यवस्थापन, पत्रकारितेसंबंधी नवे कायदे, जागतिक पत्रकारिता व जोडधंदे, एआयमुळे बदललेली पत्रकारिता, डिजिटल मीडिया - नव्या पत्रकारितेचा उदय तसेच याच वेळी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ स्मरणिका ही प्रकाशित करण्यात आली.


* मार्गदर्शनपर सत्रे आणि तांत्रिक कार्यशाळा :- पत्रकारितेतील आधुनिक तंत्रज्ञानावर गगन महोत्रा आणि सारिका पन्हाळकर यांनी मार्गदर्शन केले. 'माझ्या जिल्ह्यात माझी व्हॉईस ऑफ मीडिया’ या सत्रात जिल्हाध्यक्षांनी आपली कामगिरी सादर केली. संध्याकाळी चंद्रभागा नदीच्या तीरावर पार पडलेला ‘एक दिवा पत्रकारांसाठी’ हा भावनिक कार्यक्रम सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. शेकडो दिव्यांनी परिसर उजळून निघाला.


* दुसऱ्या दिवशी धोरणात्मक बैठक ; 15 ठराव मंजूर :- अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विविध मुद्द्यांवर चर्चा होऊन पत्रकार हितासाठी 15 ठराव पारित करण्यात आले. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र कायदा, डिजिटल मीडिया नोंदणी प्रक्रियेचे सुलभीकरण, ग्रामीण पत्रकारांसाठी प्रशिक्षण, विमा व आरोग्य सुविधांची मागणी आदी महत्त्वाचे निर्णय अधिवेशनात घेण्यात आले.


* उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा विशेष सन्मान :- राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पत्रकार व पदाधिकारी आकाश अमृतवार, लक्ष्मी वाडेकर, जितेंद्र जोगड, अनुप फुसके, वसंत खडसे तसेच व्यंकटेश दुडूमवार, रुपेश पाटील, राजेश भालेराव, अनिल करंदकर, मंगल डोंगरे, राजू कापसे, भरत म्हात्रे, उमेश काटे, गंगाधर ढवळे, गणेश आवळे आदींना सन्मानित करण्यात आले.


* संस्थेच्या कोर टीमचा मोठा सहभाग :- अधिवेशन यशस्वी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, महासचिव दिगंबर महाले, कार्याध्यक्ष विजय चोरडिया, कोषाध्यक्ष चेतन बंडेवार, संचालक व्यंकटेश जोशी यांच्यासह राज्यातील सर्व विभागांचे प्रमुख, तालुका व जिल्हा पदाधिकारी आणि स्वयंसेवकांचा मोठा सहभाग होता.


* व्हॉईस ऑफ सिनेमा’ - नव्या हिंदी न्यूज वाहिनीचे उद्घाटन :- अधिवेशनात ‘व्हॉईस ऑफ सिनेमा’ या नव्या हिंदी न्यूज चॅनेलचे उद्घाटन करण्यात आले. भक्ती, देशभक्ती, गजलसंध्या आणि ‘हरे मुरारी’ यांसारख्या कार्यक्रमांनी पंढरपूरमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले.


राज्यभरातील पत्रकार एकत्र आणून संवाद, सन्मान, प्रशिक्षण आणि पत्रकार हिताच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेणारे हे अधिवेशन ऐतिहासिक ठरल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments