Type Here to Get Search Results !

जळगाव ते छत्रपती संभाजीनगर ‘खान्देश एक्सप्रेस वे’ समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार

* 105 किमीचा प्रस्तावित मार्ग ; डीपीआर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात

* मुंबई-पुणे प्रवासात 3 ते 4 तासांची बचत होण्याची शक्यता

जळगाव / प्रतिनिधी :- खान्देश ते मराठवाडा अर्थात जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान प्रस्तावित असलेल्या 105 किलोमीटर लांबीच्या ‘खान्देश एक्सप्रेस वे’ला नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाशी जोडण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विधान परिषदेत उपस्थित झालेल्या प्रश्नानंतर राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीतून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला गती मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जळगाव ते छत्रपती संभाजीनगर तसेच चाळीसगाव ते कन्नड मार्गांवरील वाहतूक अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी गेल्या वर्षी जून महिन्यात नागपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, खासदार स्मिता वाघ, आमदार देवयानी फरांदे आणि आमदार मंगेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास सध्याच्या दोन ते अडीच तासांवरून केवळ एका तासावर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता.


* मुंबई-पुणे प्रवास होणार जलद :- सध्या जळगावहून अजिंठा, सिल्लोडमार्गे छत्रपती संभाजीनगर गाठण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात. समृद्धी महामार्गाशी जोडणी झाल्यास हा प्रवास अवघ्या एका तासांत पूर्ण होईल. छत्रपती संभाजीनगरहून समृद्धी महामार्गाद्वारे मुंबई गाठण्यासाठी सध्या सुमारे चार तास लागतात. त्यामुळे जळगावहून मुंबईला अवघ्या पाच तासांत पोहोचणे शक्य होणार आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि मुंबईदरम्यानची दळणवळण व्यवस्था अधिक गतिमान होईल. वाढत्या रहदारीमुळे जळगाव - धुळे - मालेगाव - नाशिकमार्गे मुंबई गाठण्यासाठी सध्या सात ते आठ तास लागतात. प्रस्तावित मार्गांमुळे तीन ते चार तासांची मोठी बचत होऊ शकते. दुसरीकडे, पुणे - छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस हायवे साकारल्यास जळगाव - पुणे प्रवासही अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे.


* 'खान्देश एक्सप्रेस वे’ नावाची अधिकृत घोषणा :- विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग सहापदरी करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देतांना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले की, 105 किमी लांबीचा हा प्रस्तावित महामार्ग ‘खान्देश एक्सप्रेस वे’ या नावाने ओळखला जाईल आणि तो थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाशी जोडला जाईल. सध्या या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम वेगाने सुरू असून, डीपीआर पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.


* जिल्ह्याच्या विकासाला चालना :- 'खान्देश एक्सप्रेस वे’ हा जळगाव जिल्ह्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. उद्योग, शेतीमाल वाहतूक, पर्यटन आणि गुंतवणूक यांना या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.


डीपीआर अंतिम टप्प्यात असल्याने या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होणार, याकडे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रस्तावित जोडणी साकारल्यास जळगाव, चाळीसगाव, कन्नड तसेच संपूर्ण खान्देश प्रदेशाच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments