* बोर्ड परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर शिक्षकाचे विद्यार्थिनीशी गैरवर्तन
* मोबाईल क्रमांक घेऊन वारंवार फोन करून देत होता त्रास
* नातेवाईकांसह संस्था चालकाने दिली चोप, शिक्षक निलंबित
* शिक्षकाने चूक कबूल केल्यानंतर मारहाण, पोलिसांत तक्रार, अंतर्गत चौकशी सुरू
छ. संभाजीनगर / प्रतिनिधी :- सध्या सुरू असलेल्या 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षांच्या काळात छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर परिसरातील एका परीक्षा केंद्रावर धक्कादायक घटना घडली आहे. परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन करून तिचा मोबाईल क्रमांक घेतला आणि नंतर वारंवार फोन करून त्रास दिल्याचा गंभीर आरोप संबंधित शिक्षकावर करण्यात आला आहे. या प्रकरणात संतप्त नातेवाईकांनी शिक्षकाला संस्था चालकासमोर बोलावून चोप दिल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर शिक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात आले असून पोलिसांनी तक्रार दाखल करून चौकशी सुरू केली आहे.
* परीक्षा केंद्रावर घडला प्रकार :- मिळालेल्या माहितीनुसार, बजाजनगर परिसरातील एका शाळेत परीक्षा केंद्र सुरू होते. या केंद्रावर गार्डिंगसाठी नियुक्त असलेल्या एका शिक्षकाने परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले. शिक्षकाने मुलीशी अश्लील भाषेत बोलणे, अनुचित प्रश्न विचारणे आणि तिचा मोबाईल क्रमांक घेण्याचा प्रयत्न केला. परीक्षेनंतर शिक्षकाने तिच्या मोबाईलवर वारंवार कॉल करून त्रास देणे सुरू केले. घाबरलेल्या मुलीने हा प्रकार तात्काळ घरातील व्यक्तींना सांगितला.
* नातेवाईकांनी केली थेट कारवाई :- मुलीच्या नातेवाईकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. त्यांनी संबंधित शिक्षकाला संस्था चालकासमोर बोलावले. चौकशीदरम्यान शिक्षकाने आपली चूक कबूल केली आणि माफी मागितल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, संतप्त नातेवाईकांनी शिक्षकाला चांगलाच चोप दिला, या मारहाणीत शिक्षक जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परीक्षा केंद्र परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
* पोलिसांत तक्रार, चौकशी सुरू :- मुलीच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी विद्यार्थिनीचा जबाब नोंदविला असून, इतर विद्यार्थिनींकडूनही माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिक्षकाने इतर मुलींनाही असाच त्रास दिला असावा, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी सांगितले की, गैरवर्तनाच्या आरोपांची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.
* शिक्षणसंस्थेची प्रतिक्रिया :- या घटनेनंतर शिक्षणसंस्थेने तात्काळ कारवाई केली. संबंधित शिक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. संस्थेने अंतर्गत चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. "विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड होणार नाही. दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल," असे संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
* पालक आणि समाजातील संताप :- या घटनेने पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. परीक्षा काळात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांवर अधिक कडक सुरक्षा व्यवस्था आणि महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.

Post a Comment
0 Comments