Type Here to Get Search Results !

सम्यक कोकण कला संस्था गुहागर शाखेचा रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त 50 कलावंतांचा भव्य सन्मान सोहळा

* 25 वर्षांची कलासेवा : दुर्लक्षित व नवोदित कलाकारांना व्यासपीठ देण्याच्या ध्येयाचा गौरव

गुहागर / रामदास धो. गमरे :- सम्यक कोकण कला संस्था (रजि.), महाराष्ट्र या संस्थेने 25 वर्षांची उल्लेखनीय वाटचाल पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर गुहागर शाखेच्या वतीने 50 कलावंतांच्या सन्मानाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवार, 28 मार्च 2026 रोजी भवानी सभागृह, शृंगारतळी (पालपेणे रोड) येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

* महेश गमरे यांच्या प्रेरणेतून संस्थेची स्थापना :- गुहागर तालुक्यातील मुक्काम व परचुरी गावचे सुपुत्र, सुप्रसिद्ध कवी-गायक महेश गमरे (महेश बाबू) यांच्या प्रेरणेतून या संस्थेची स्थापना करण्यात आली. स्थापनेपासून संस्थेने महाराष्ट्रभर अनेक गुणी कलावंत घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.


* दुर्लक्षित कलाकारांना व्यासपीठ देण्याचे ध्येय :- प्रसिद्धीपासून दूर असलेल्या गुणी कलाकारांचा शोध घेऊन त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, पडत्या काळात त्यांना मदतीचा हात देणे आणि नवोदित प्रतिभेला संधी देणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे. विविध कलाक्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या कलाकारांचा सन्मान करून त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचे कार्यही संस्था सातत्याने करीत आहे.


* 50 कलावंतांचा गौरव : बाळकृष्ण पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा :- रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमात विविध कलाक्षेत्रातील 50 कलावंतांचा सन्मान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ कवी बाळकृष्ण पवार (गुरुजी) यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार आहे.


या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मंदार कवाडे, कार्याध्यक्ष भगवान साळवी, चिंतामण जाधव, सचिव नरेश शिंदे, कोषाध्यक्ष सुरेश सावंत, तसेच मुकुंद तांबे, विनोद धोत्रे, संजय गमरे, प्रविण मोहिते, संतोष घाडगे, चंद्रमणी घाडगे, चंद्रकांत तांबे, मारुती शेलार, अष्टशिला बनसोडे, मीनाक्षी थोरात, अनिता गायकवाड, वर्षा शिंदे, विकास तांबे, शरद येलवे, माजी महासचिव राजाभाऊ (रामदास धो. गमरे) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुहागर शाखेचे सचिव उत्तम पवार (तळवली) हे करणार असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष मोहिते, दीपक गमरे, मिलिंद कदम, भीमसेन सावंत, सुरेश जाधव, प्रविण पवार, अविनाश गमरे आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.


* कलावंतांना उपस्थित राहण्याचे आवाहन :- या भव्य सन्मान सोहळ्यास गुहागर तालुक्यातील सर्व कलावंतांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments